१० महिन्यांपासून देऊळवाडा गावात पाणीटंचाई
By Admin | Published: June 19, 2016 12:54 AM2016-06-19T00:54:30+5:302016-06-19T00:54:30+5:30
तालुक्यातील देऊळवाडा येथे गेल्या १० महिन्यांपासून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
सरपंचाचा आरोप : पंचायत समिती, वेकोलि प्रशासनाने दुर्लक्ष
भद्रावती : तालुक्यातील देऊळवाडा येथे गेल्या १० महिन्यांपासून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत असून पंचायत समिती, वेकोलि प्रशासन, लोकप्रतिनिधींना वारंवार सूचना करुन सुद्धा गावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील सरपंच सुनिता बलकी यांनी पत्रकार परिषदेत केला.
८०० लोकसंख्या असलेल्या देऊळवाडा गावात लोकसहभागातून ट्युबवेल व पाण्याची टाकी बांधण्यात आली. गेली कित्येक वर्ष या टाकीद्वारे संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केल्या जात होता. मात्र एक वर्षापूर्वी ट्युबवेल निकामी झाल्याने गावातील पाणी पुरवठा बंद झाला. येथील नागरिकांची ओरड लक्षात घेता, येथील सरपंच बलकी यांनी पंचायत समितीला गावातील पाणी पुरवठा बंद असल्याच्या सूचणा केली. मात्र येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी याबाबत मौन पाळले. या बाबतचे लेखी निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकारी, ग्रामीण पुरवठा विभाग या शासकीय विभागाकडे दिले. मात्र १० महिने लोटूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असे सांगितले.
पाणीटंचाईचा प्रश्न आमदार, खासदार, वित्तमंत्री यांच्याकडे सुद्धा निवेदनाद्वारे मांडला. परंतु त्यांनी सुद्धा या देऊळवाडा गावाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या गावाला वेकोलि प्रशासनाने दत्तक घेतले खरे. मात्र येथील सुखसुविधाकडे दुर्लक्ष आहे. येथील महाप्रबंधकाला निवेदन देवून नवीन ट्युबवेल खोदून देण्याचा आग्रह केल असता, गावात ट्युबवेल खोदण्यात आले ते दोनच दिवसात निकाली झाले. ज्या कंत्राटदाराला ट्युबवेलचे खोदकाम देण्यात आले होते. त्यांनी हा ट्युबवेल यशस्वी झाला असे सांगून महाप्रबंधक कार्यालयातून बिल काढण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप बलकी यांनी केला. गावात पाण्याची व्यवस्था करुन द्यावी, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा, सरपंच बलकी, उपसरपंच मंगेश झाडे, सदस्य रंजना आत्राम, संगीता बावणे, श्याम रामटेके, गोपालकृष्ण बलकी यांनी दिला आह. (शहर प्रतिनिधी)