देलनवाडी येथील पाण्याचा झरा चमत्कार नसून नैसर्गिक स्रोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2017 01:06 AM2017-04-22T01:06:53+5:302017-04-22T01:06:53+5:30
सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे श्री. ऋषी देवस्थानच्या टेकडीच्या पायथ्याशी पाण्याचा झरा लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली.
थेंब-थेंब पाणी झिरपतेय : बघ्यांची गर्दी संपता संपेना
दिलीप मेश्राम नवरगाव
सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी येथे श्री. ऋषी देवस्थानच्या टेकडीच्या पायथ्याशी पाण्याचा झरा लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली. काही लोकांना ही देवाची कृपा वाटली. परंतु हा प्रकार चमत्कार वगैरे नसल्याचे सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
देलनवाडी येथे पुरातन श्री. ऋषी देवस्थान एका उंच टेकडीवर आहे. टेकडीच्या दोन्ही भागाला निवासी वस्ती आहे. तर मागच्या भागात शेतजमीनआहे. मनोहर गोबाडे यांच्या शेतीलगत टेकडीच्या मागच्या भागाला काही नागरिकांना पाणी वाहताना दिसले. तोंडातोंडी ही घटना गावामध्ये चर्चेचा विषय ठरली. पुन्हा थोडे खोदकाम केल्यानंतर आणखी पाणी निघाले. यावेळी नागरिकांनी हा चमत्कार असल्याची चर्चा सुरू केली. यावर काहींचा विश्वासही बसला. ज्या टेकडीच्या पायथ्यामधून पाणी निघत आहे.
तो भाग आणि शेतामध्ये विहिरीतील पाण्याची पातळी यांची तुलना केल्यास २५ ते ३० फूट अंतर आहे. म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळी २५ ते ३० फूट खोल आहे. त्याच्यावर झरा आहे. त्यामुळे झऱ्याला पाणी कुठून येते, याबद्दल नागरिकांमध्ये कुतूहल आहे.
हा प्रकार मागील आठ-नऊ दिवसांपासून सुरू असून टेकडीमधून पाणी कमी-अधिक प्रमाणात झिरपत आहे. त्या ठिकाणावरून गेल्या दोन-तीन दिवसांपासून अत्यल्प पाणी झिरपत आहे. काही गावकऱ्यांनी चमत्कार समजून एका महाराजांना पाचारण करून पूजा केली. ते महाराज मागील आठ-नऊ दिवसांपासून त्याच ठिकाणी निवासी आहेत. तेथे त्यांनी दानपेटीही लावली असून नागरिक पेटीमध्ये दानही टाकत आहेत. याबाबत ‘लोकमत’ वार्ताहराने महाराजांसोबत चर्चा केली असता ‘ही सर्व देवाची करणी असल्यानेच उन्हाळ्याचे दिवस असतानाही पाणी निघत आहे. त्यामध्ये पाणी पुन्हा वाढण्याची शक्यताही महाराजांनी व्यक्त केली.
प्रत्यक्षात पाण्याचा प्रवाह दिवसेंदिवस कमी-कमी होत चालला असून घटनास्थळाला भेट दिली असता थेंब-थेंब पाणी झिरपताना दिसले. टेकडीच्या पायथ्याशी एका विशिष्ट ठिकाणावरून पाणी झिरपत आहे. परंतु या उंच ठिकाणी पाणी नेमके कुठून येते, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पाणी झिरपत असलेल्या ठिकाणापासून ३०० ते ३५० फूट अंतरावरून नळयोजनेचा पाईप टेकडीवर ऋषी देवस्थानाकडे गेलेला आहे. तसेच टेकडीवर पुरातन विहीरही होती. ती अलीकडे बुजविण्यात आली आहे. कदाचित त्या विहीरीतील पाणी, नळयोजनेच्या लिक झालेल्या पाईपमधील पाणी किंवा दगडांची टेकडी असल्याने पावसाळ्यात पाणी साचले आणि त्याला मार्ग मिळाल्याने ते दगडांमधून झिरपत येत असावे, असा अंदाज सुज्ञ नागरिक वर्तवित आहेत.
या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाहीचे तहसीलदार भास्कर बांबोळे व नायब तहसीलदार रामचंद्र नैताम यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यावेळी केवळ थेंब-थेंब पाणी निघत होते. नायब तहसीलदार नैताम यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ही घटना म्हणजे चमत्कार वगैरे काहीही नसून असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत असतात. उंच टेकडीवर उन्हाळ्यातसुद्धा पाणी झिरपताना दिसते. त्यामुळे या घटनेकडे नागरिकांनी चमत्कार म्हणून पाहू नये तर वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
याबाबत देलनवाडी येथील खेमराज गोविंदा डोंगरवार यांच्याशी चर्चा केली असता त्यांच्या मते, हा चमत्कार नसून चमत्कार घडविण्यासाठी भूतलावर आता माणसेच राहिली नाहीत. माणसामध्ये प्रामाणिकपणा राहिला नाही. ऋषी देवस्थानाकडे नळयोजनेद्वारे पाणी येते. त्यातील एखादा पाईप लिक झाला असावा, असे मत डोंगरवार यांनी व्यक्त केले.