पाण्याचे स्रोत चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:13 PM2018-02-03T23:13:40+5:302018-02-03T23:14:56+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळा राज्यात परिचित आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या जिल्ह्यात पाण्याची बोंब असते.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळा राज्यात परिचित आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या जिल्ह्यात पाण्याची बोंब असते. मात्र प्रशासनाचे पाणी टंचाई आराखडे कागदावरच रंगतात आणि कागदावरच ते संपुष्टात येतात, असा अनुभव अनेकदा जिल्हावासीयांना आला आहे. यावर्षीही प्रशासनाने तीच री ओढली आहे. यंदा अत्यल्प पाऊस पडला. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच प्रकल्प चिंताजनक स्थितीत आहेत. भूजल पातळीही कमालीची खालावली आहे. हिवाळ्यातच पाण्याचे स्रोत आटत असताना प्रशासन पाणी टंचाई आराखडा व उपाययोजनाबाबत गंभीर दिसत नाही. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात चहुबाजुंनी पाण्यासाठी टाहो फोडला जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मार्चच्या पंधरवड्यानंतरच उन्हाळ्याची चाहुल लागते. पुढे एप्रिल, मे आणि जून महिन्यात ही धग कायम राहते. यंदा जोरदार पर्जन्यमान होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला आहे. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने लोटले. तरीही जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली नव्हती. जिल्ह्यात पावसाची सरासरी ११३५.४०६ मिमी आहे. मात्र सरासरीच्या निम्म्यावरच पाऊस थांबला. जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूणच जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे संकट घोंगाऊ लागले आहे.
असे असले तरी जिल्हा व जि.प. प्रशासन याबाबत अद्याप गंभीर झालेले दिसत नाही. जिल्हा परिषदेचे पाणी टंचाई आराखडा अद्याप सज्ज झालेला नाही. नवीन विंधन विहीर व कुपनलिका, नळ योजनेची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना, टँकर-बैलगाडीने पाणी पुरवठा करणे, विहिरीचे खोलीकरण, गाळ काढणे, इनवेल बोर, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, विंधन विहिरींचे जलभंजन आदी उपाययोजना गावागावात करायच्या असतात. मात्र या उपाययोजनांबाबत अद्यापही कुठला निर्णय जि.प. स्तरावर झालेला दिसत नाही.
वरूणराजाच्या वाकुल्या
वेळशाळेच्या अंदाजामुळे शेतकरी मोठ्या उत्साहात होते. पहिल्या पावसात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र त्यानंतर पाऊस अचानक गायब झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. जुलै महिना सर्वाधिक पावसाचा महिना मानला जातो. मात्र चार दिवसांचा अपवाद वगळला तर हा संपूर्ण महिना कोरडा गेला. जिल्ह्यात पावसाची सरासरी ११३६.४०६ मिमी आहे. मागील वर्षी सरासरी ओलांडून म्हणजेच १३९५.७१३ मिमी पाऊस बरसला. मात्र यावर्षी वरूणराजाने जिल्ह्याला वाकुल्या दाखविल्या. जून व जुलै या दोन्ही महिन्यात सरासरी केवळ ३९६.५६ मिमी पाऊस पडला होता.
इरई धरणात १८ टक्के पाणी
चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र सद्यस्थितीत इरई धरणात केवळ १८.३९ टक्केच पाणी आहे. या धरणातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालाही पाणी दिले जाते. त्यामुळे या धरणातून झपाट्याने पाण्याची पातळी कमी होते. येत्या काही दिवसात यातील साठा आणखी कमी होऊन चंद्रपूरकरांवर पाण्याचे भिषण संकट ओढवू शकते.
मामा तलावांची स्थितीही बिकट
मामा तलावांना शेतकऱ्यांचे संरक्षित सिंचन म्हटले जाते. या तलावांमुळे ग्रामीण भागातील पाण्याची पातळी टिकून राहते. मात्र यावर्षी पाऊसच न पडल्याने जिल्ह्यातील मामा तलावातही पाण्याचा अत्यल्प साठा शिल्लक आहे. यामुळे गावखेड्यातील पाण्याचे स्रोत झपाट्याने आटत चालले आहे. पाण्याची पातळी खालावल्याने बोअरवेल, विहिरीची पातळीही घटली आहे. त्यामुळे ग्रामीण पट्ट्यातील बहुतांश भागात पाणी टंचाई जाणवत आहे. दूरवरून नागरिकांना पाणी आणावे लागत आहे.