नियोजनाअभावी आटताहेत जलस्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:04 AM2018-04-12T01:04:31+5:302018-04-12T01:04:31+5:30

‘दुर्गावरील पाणी बहुत जतन करावे, दुर्गावरील आधी उदक पाहून दुर्ग बांधावा. पाणी नाही उदक नाही ते स्थळी तो बांधणे आवश्यक झाले तरी आधी खडक फ ोडून तळी, टाकी पर्जन्यस्थळी संपूर्ण दुर्गास पाणी पुरेल ऐशी मजबूत बांधावी... दुर्गाचे पाणी बहुत जतन करावे...’

Water sources fluttering due to lack of planning | नियोजनाअभावी आटताहेत जलस्रोत

नियोजनाअभावी आटताहेत जलस्रोत

Next
ठळक मुद्देजलसिंचनासाठी तुटपुंजी तरतूद : जलस्रोत आणि गोंडकालीन जलव्यवस्थापन नष्ट होण्याच्या मार्गावर

राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘दुर्गावरील पाणी बहुत जतन करावे, दुर्गावरील आधी उदक पाहून दुर्ग बांधावा. पाणी नाही उदक नाही ते स्थळी तो बांधणे आवश्यक झाले तरी आधी खडक फ ोडून तळी, टाकी पर्जन्यस्थळी संपूर्ण दुर्गास पाणी पुरेल ऐशी मजबूत बांधावी... दुर्गाचे पाणी बहुत जतन करावे...’ छत्रपती शिवाजी महाराजांचे हे आज्ञापत्र राज्यकर्त्यांचे जलसिंचन कसे असावे, याचा हा प्रेरणादायी वस्तुपाठ आहे. मात्र, चंद्रपूर शहरातील गोंडकालिन जलस्रोत, ‘हतनी’ (हौद) सारखी पाणीपुरवठा व्यवस्था आणि तीनशे वर्षांपूर्वी बांधलेल्या जिल्ह्यातील १७२९ मामा तलावांचे अस्तित्व नियोजनाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ऐतिहासाहिक ‘जलस्रोतांच्या जिव्हारी नियोजनाचा घात आणि माणसांचाही श्वास कोंडलेला... ’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

इ. स. १४७२ ते १४९७ या कालखंडात पहिले गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह यांनी चंद्रपुरात गोंडराजाची राजधानी स्थापन केली. या न्यायप्रिय राजाने १५ व्या शतकात चंद्रपूर किल्ल्याची पायभरणी केली. त्याचवेळी शहराच्या ईशान्य भागास सुमारे १५८ जागेमध्ये तलाव तयार केला. याच तलावाला ‘रामाळा तलाव’ म्हणून ओळखले जाते. या तलावाची व्याप्ती आणि खोलीचा अजुनही शास्त्रशुद्ध अभ्यास झाला नाही. अलीकडे जलविज्ञान ही अभ्यासशाखा तयार झाली आहे. या शाखेमध्ये जलस्त्रोत आणि पुरवठ्यासंदर्भातही मूलगामी संशोधन केले जाते. रामाळा तलावाची बांधणी केल्यानंतर यातून चंद्रपूर शहराला पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने सुमारे १५ हौद बांधण्यात आले. या हौदांना ‘हतनी’ असे म्हणतात. नागपूरकर भोसल्यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर चंद्रपूर शहरावर ब्रिटिशांची राजवट सुरू झाली. तत्कालीन ब्रिटीश अधिकारी जे. एन. सील या अधिकाऱ्याचा अपवाद वगळल्यास गोंडकालिन पाणीपुरवठा व्यवस्थेची जलविज्ञानाच्या दृष्टीकोनातून अद्याप अभ्यास नाही. ब्रिटीश कालखंडात १९१४ च्या सुमारास शहरात पाणी पुरवठा योजना सुरू झाली. नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतरही गोंडकालिन हौदांचा दीर्घकालिन उपयुक्ततेच्या दृष्टीने विचारच झाला नाही.
शहर विकासाचा आराखडा तयार करताना या ऐतिहासिक हौदांचा वापर झाला असता तर विद्यमान जलसंकटांची तीव्रता संपली असती, असा दावा अभ्यासक व जलचळवळीत कार्यकर्त्यांनी केला आहे. या हौदांवर अतिक्रमण करून काही घरे, रस्ते उभारले. तर काहींवर कचरा टाकून नष्ट करण्यात आले. त्यामुळे आज एकही ऐतिहासिक हौद अस्तित्वात नाही.

कशी येईल ‘जलसमृद्धी’
़वनसंपदा व माजी मालगुजारी तलावांचा जिल्हा म्हणून चंद्रपुरची राज्यभरात ओळख आहे़ या परिसराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन गोंड राजांनी सुमारे अडीचशे ते तिनशे वर्षांपूर्वी मामा तलाव बांधले. केवळ किल्ले उभारून जनता सुरक्षित राहणार नाही तर त्यासाठी जलसिंचनाच्या पायाभूत सुविधांवर भर दिला होता. परिस्थितीत शेती हाच सर्वसामान्य जनतेच्या जगण्याचा आधार असल्याने गोंड राजांनी शेती आणि सिंचन या दोन्ही क्षेत्राला प्राधान्य दिले. राणी हिराईने उभारलेला रामाळा तलाव आजही सुरक्षित आहे. जलसिंचनाची दुरगामी दृष्टी ठेवणाºया राणीने शेतीसह पाणी पुरवठ्याची मूलभूत पायाभरणी केली आहे. पूर्व विदर्भात गोंड साम्राज्याचा विस्तार केला़ स्थानिक संसाधनांचा वापर करून चंद्रपूर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ७५०२ तलावांची निर्मिती केली़ स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये राज्य सरकारने मालगुजारी तलावांना अधिपत्याखाली घेतले. त्यामुळे तलावांना माजी मालगुजारी तलाव असे म्हटले जाते़ हे तलाव आर्थिक व तांत्रिक बाबींचा विचार न करता बांधण्यात आले. तलावांचे पाणीग्रहन क्षेत्र उथळ आहे. पण, जलविज्ञानाचे भान ठेवून योग्य नियोजन केले नाही. तसेच मंजूर निधी त्याच कामावर खर्च न झाल्याने जलसमृद्धीचे स्वप्न भंगले.

कंत्राटदार जिंदाबाद !
जिल्हा परिषदेकडे एक हजार ३२४ मामा तलाव आहेत. तर लघु पाटबंधारे विभागाकडे १५४ आणि पाटबंधारे विभागाकडे ५१ मामा तलावांची जबाबदारी देण्यात आली. जिल्ह्यातील एक हजार ७२९ तलावांपैकी ४४० तलावांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या तलावांच्या दुरूस्ती मोहिमेत केवळ १७६ तलावांचाच समावेश करण्यात आला. जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची क्षमता असलेले मामा तलाव कंत्राटदारांच्या कचाट्यात अडकले आहेत.
सुधारित मापदंडानेही अपेक्षाभंग
जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या कार्यक्षेत्रातील तलावाच्या विशेष दुरूस्तीसाठी सुधारीत मापदंड तयार करण्यात आले. या मापदंडामध्ये तीन बाबींचा समावेश आहे. दुरुस्ती व पुर्नरस्थापनेची कामे, यांत्रिकी संघटनेच्या मशिनरीमार्फत गाळ काढणे आणि अनुषंगिक खर्च, असे या दुरुस्तीचे स्वरूप आहे. हे मापदंड लागू करताना २०१४-१५ चा महागाई निर्देशांक गृहित धरण्यात आला. त्यानुसारच तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेष दुरुस्तीसाठी २८ हजार रुपये प्रति हेक्टर असा दर निश्चित करण्यात आला. त्यामुळे ‘तलावांची संख्या अधिक व निधीचा दुष्काळ’ अशी कसरत प्रशासनाला करावी लागत आहे.

कुठे गेले गोंडकालीन‘हौद’?
रामाळा तलावातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १४ हौद गोंडराजा रामशहा तसेच राणी हिराईच्या कालखंडात बांधण्यात आले होते. त्यापैकी भानापेठ वॉर्डातील ‘हौद’ (हतनी) सोडल्यास सर्वच अतिक्रमणात नष्ट झाले आहेत. नष्ट झालेल्या हौदांमध्ये रामाळा तलावनजीकचा हौद, गंजवार्ड, अंचलेश्वर वॉर्ड, जिल्हा कारागृह परिसर तसेच दादमहल वॉर्डाचा समावेश आहे. या हौदांची रचना स्थापत्य आणि जलविज्ञानाच्या दृष्टीनेही मार्गदर्शक ठरले असते. मात्र, चुकीच्या नियोजनामुळे हौद नष्ट झाले.

चंद्रपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थेने पिण्याच्या पाण्याचे स्वत:चे स्त्रोत निर्माण केले नाही. त्याचे परिणाम शहरातील जनता भोगत आहे. गोंडकालिन जल व्यवस्थापनापासून बोध घेऊन बदलत्या काळानुसार नियोजन करण्यासारख्या अनेक मूलभूत बाबी त्यामध्ये आहेत. हा ऐतिहासिक जलवारसा नष्ट करणे कुणाच्याही उपयोगाचा नाही. यातूच नुकसानच अधिक आहे. दीर्घकालिन नियोजनाच्या दृष्टीने आजही या वारशाचे पुनरूज्जीवन करता येऊ शकते, त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे.
- संजय वैद्य,
जिल्हा संयोजक, जलबिरादरी, चंद्रपूर

Web Title: Water sources fluttering due to lack of planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.