२०० गावांचा पाणी पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:23 PM2018-10-01T23:23:08+5:302018-10-01T23:23:35+5:30
जानेवारी महिन्यापासून कंत्राटदारांच्या कोट्यवधी रूपयांचे देयक अदा करण्यासाठी जि.प.ने निष्क्रीयता दाखविली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तब्बल दोनशे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
शशीकांत गणवीर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : जानेवारी महिन्यापासून कंत्राटदारांच्या कोट्यवधी रूपयांचे देयक अदा करण्यासाठी जि.प.ने निष्क्रीयता दाखविली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तब्बल दोनशे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ३५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभालची जबाबदारी कंत्राटदारांकडे देण्यात आली. करारानुसार या योजनेची मूदत ३१ मार्च २०१८ ला संपूनही मुदतवाढ देण्यात आली नाही.
तेव्हापासून कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता सुरू आहे. दरम्यान, विभागीय कार्यालयाच्या निर्देशानुसार उन्हाळा व पाणी टंचाई लक्षात घेऊन कंत्राटदारांनी आजपर्यंत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत चालु ठेवला. मात्र सन २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांतील सर्व प्रादेशिक योजनांची अंतिम देयके कंत्राटदारांना अजूनपर्यंत देण्यात आले नाही.
कंत्राटदारांनी केला होता पाठपुरावा
याबाबत कंत्राटदारांनी जिल्हा परिषदचे पदाधिकारी व संबंधित विभागाकडे वारंवार पत्र व्यवहार केला होता. मात्र या पत्रांचा काहीही उपयोग झाला नाही. पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाकपणा केला. त्यामुळे कंत्राटदारांकडे कार्यरत असणाºया कामगारांचे वेतन, ब्लिचिंग पावडर खरेदी करणे, पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरूस्तीचा खर्च कसा करावा, हा प्रश्न उभा ठाकला. या गंभीर प्रश्नाकडे जि. प. ने दुर्लक्ष केल्याने हतबल झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला.
३५ योजनाही बंद
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, याकरिता दोनशे गावांकरिता जिल्हा परिषदअंतर्गत प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या ३५ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांची देखभाल दुरूस्ती, ब्लिचिंग टाकणे, कामगारांना वेतन देण्याची जबाबदारी कंत्राटदारांकडे सोपविण्यात आली.
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतकडे पाणीकर थकित असल्यामुळे अडचण निर्माण होत आहेत. निधी नसल्यामुळे कंत्राटदारांची देयके अदा करण्यात आली नाही. निधीची तरतूद करून सर्व गावांचा पाणी पुरवठा सुरू होईल, यादृष्टीने कार्यवाही केली जात आहे.
-टी. सी. पिपरे, कार्यकारी अभियंता,
ग्रामीण पाणी पुरवठा, जि.प. चंद्रपूर