वसाहतीतून हटविण्यासाठी ८४ घरांचा पाणीपुरवठा अन् वीज कापली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 03:07 PM2024-05-11T15:07:05+5:302024-05-11T15:07:39+5:30
वेकोलिचा प्रताप : संतप्त महिलांची वेकोलि कार्यालयावर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : अनेक वर्षांपासून बल्लारपूर वेकोलि उपक्षेत्रातील वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबांना हटविण्यासाठी वेकोलि प्रशासनाने ७ मेपासून वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत ८४ घरांवर अशी कारवाई केल्याने संतप्त महिलांनी गुरुवारी (दि. १) वेकोलि कार्यालयावर मोर्चा नेऊन तीव्र विरोध केला.
शहरातील शहीद भगतसिंग व सुभाष वॉर्डात वेकोलिची वसाहत आहे. या वसाहतींमध्ये आधी वेकोलित काम करणारे कामगार राहत होते. मात्र, सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी ही वसाहत सोडली नाही. ज्यांनी सोडली त्या जागेवर बाहेरच्या व्यक्तींनी बेकायदा कब्जा केल्याचा वेकोलि प्रशासनाचा आरोप आहे. त्यामुळे वेकोलिने क्वॉर्टर खाली करण्याच्या नोटिसा संबंधित कुटुंबांना बजावल्या. सूचना देऊनही या कुटुंबांनी घर खाली केले नाही. वेकोलि प्रशासनाने आता कठोर भूमिका घेऊन महावितरण, पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र सुरक्षा बल घेऊन घरे खाली करण्याची मोहीम सुरू केली आहे. वसाहतीत बेकायदेशीर राहणाऱ्यांना क्वॉर्टर खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या जात आहेत.
वीज व पाण्यावर लाखोंचा खर्च
वेकोलिकडून वीज च पाणीपुरवठा केला जात असल्याने वर्षाला लाखोंचा खर्च होतो. पण, तिथे राहणाऱ्यांकडून कराच्या रूपात काहीही मिळत नाही. त्यातच वसाहतीमधील अनेक घरे जीर्ण झाली.
पावसाळ्यात धोका निर्माण होऊ शकतो. वेकोलिने नोटिसा बजावूनही करजा असणारे कुटुंब ती वसाहत सोडायला तयार नाही.
वेकोलिची कारवाई कशासाठी?
निवृत्ती झाल्यानंतरही अनेकांनी वसाहत सोडली नाही. शिवाय वेकोलिचे कर्मचारी नसताना काहींनी बळजबरीने वसाहत ताब्यात घेतली. त्यामुळे संबंधितांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले, असा दावा वेकोलिने केला आहे.
मोर्चा काढल्याने तूर्त कारवाई स्थगित
वेकोलि महाव्यवस्थापक इलियास खान यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर उपक्षेत्राचे अधिकारी कलकल, कार्मिक व्यवस्थापक शब्बीर खान तडवी यांच्या देखरेखीत वेकोलि वसाहतीत बेकायदा राहणाऱ्या ८ ब्लॉगमधील ६४ घरांची वीज व २० घरांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. वसाहतीत राहणाऱ्या महिलांनी मोर्चा काढल्याने आज कारवाई बंद होती.
कुटुंबांचे म्हणणे काय?
कुठलीही कार्यवाही नियमानुसार व्हायला हवी. वेकोलिने आमचे म्हणणे जाणून न घेता थेट कारवाईचे पाऊल उचलले, वीज व पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळे आम्ही जायचे कुठे, असा प्रश्न शहीद भगतसिंग व सुभाष वॉर्डाच्या वेकोलि वसाहतींमधील नागरिकांनी केला आहे.