चंद्रपूरचा पाणीपुरवठा चार दिवस ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:32 AM2019-05-15T00:32:48+5:302019-05-15T00:33:53+5:30

चंद्रपूर-मूल महामार्गाच्या बांधकामात चंद्रपूर महानगराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन विस्कळीत झाली. यामुळे शहरातील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणीच पोहचणे बंद झाले आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. परिणामी चार दिवस चंद्रपूरकरांना नळाचे पाणी मिळणार नाही.

The water supply of Chandrapur remained suspended for four days | चंद्रपूरचा पाणीपुरवठा चार दिवस ठप्प

चंद्रपूरचा पाणीपुरवठा चार दिवस ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मुख्य जलवाहिनी क्षतिग्रस्त : निष्काळजीपणाचा चंद्रपूरकरांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर-मूल महामार्गाच्या बांधकामात चंद्रपूर महानगराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन विस्कळीत झाली. यामुळे शहरातील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणीच पोहचणे बंद झाले आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. परिणामी चार दिवस चंद्रपूरकरांना नळाचे पाणी मिळणार नाही. आधीच चंद्रपूरच्या विविध भागात कृत्रिम पाणी टंचाई असताना आता संपूर्ण शहरालाच याची झळ पोहचणार आहे.
शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता घेता महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे व परिसरातील नगरसेवकांद्वारे जलवाहिनीची पाहणी करण्यात आली असून चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे सावरकर चौक ते बंगाली कॅम्प (मूल रोड) येथील रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु आहे याच भागातून चंद्रपूर शहर महानगरपालिकेची तुकूम जलशुद्धीकरण केंद्र ते बाबुपेठ येथील पाणीपुरवठा करणारी ५०० एमएम व्यासाची जलवाहिनी गेली आहे. याद्वारे शहरातील बंगाली कॅम्प, बाबुपेठ, सहकार नगर, नेहरू नगर इत्यादी भागाला पाणीपुरवठा केला जातो, सोबतच केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्याचेही काम जलद गतीने सुरु आहे, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला अवगत करण्यात आले असतानासुद्धा निष्काळजीपणाने खोदकाम करून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे केले जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे येथील रस्ता चौपदरीकरणाचे काम अहमदनगर येथील ए.सी शेख कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून त्यांना खोदकामाने पाणीपुरवठा खंडित होण्याच्या सूचना वारंवार देण्यात येऊन सुद्धा जलवाहिनी क्षतिग्रस्त करण्याचे काम सुरु आहे. याबाबत पाहणीदरम्यान आयुक्तांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात समज दिली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून महानगरपालिकेचे सहायक आयुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, संजय जोगी पूर्ण वेळ दुरुस्ती कामावर लक्ष ठेऊन आहेत. चंद्रपूरकरांना मात्र चार दिवस पाण्यासाठी कसरत करावी लागणार आहेत.
कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई होणार -अंजली घोटेकर
मूल मार्गावर चंद्रपूर शहराची मुख्य पाईप आहे. ती बांधकाम करताना उघडी पडल्यानंतर तीला जेसीबीने सरकविण्यात आली. यामुळे पाईपलाईन विस्कळीत होऊन त्यातून टाकीमध्ये जाणारे पाणी बाहेर फेकल्या गेले. ही कृती मागील काही दिवसांपासून या मार्गावर सुरू असल्याचा आरोप महापौर अंजली घोटेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून सदर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले असून जनतेला वेठीस धरणाºया कंत्राटदारावर फौजदारी कारवाईचे संकेतही महापौर घोटेकर यांनी दिले.

रस्ता बांधकामाची गती ढिम्म
चंद्रपूर-मूल महामार्गाच्या सिमेंट कॉक्रीटीकरणासाठी काही महिन्यांपासून रस्त्याचे खोदकाम केलेले आहे. रस्ता खोदकाम केल्यानंतर रस्त्याच्या कडेला सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आले. तोपर्यंत खोदलेल्या रस्त्यावर कोणतेही काम केले नाही. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. खोदकाम केल्यानंतर लगेच रस्ता बांधकाम सुरू करण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत.

४५ अंश तापमानाने चंद्रपूरकर बेजार
एप्रिल महिन्यापासून चंद्रपूरात सूर्य आग ओकत आहे. पारा ४५ अंशाच्या खाली उतरता उतरत नाही आहे. यामुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. अशातही काही भागातील नळांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक बेजार आहे. आता तब्बल ६० टक्के भागातील नळच दोन दिवस येणार नसल्यामुळे पाण्याची पर्यायी सुविधा नसणाºया नागरिकांवर कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे पाण्यासाठी भर उन्हात भटकंती करण्याची पाळी आली आहे.

Web Title: The water supply of Chandrapur remained suspended for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.