मूलला २४ तास पाणीपुरवठा
By admin | Published: June 11, 2017 12:28 AM2017-06-11T00:28:48+5:302017-06-11T00:28:48+5:30
विदर्भात सर्वाधिक विकसित तालुक्याचे शहर म्हणून मूल शहराचे नाव आगामी काळात घेतले जाईल,...
सुधीर मुनगंटीवार : विदर्भात सर्वाधिक विकसित शहर बनविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : विदर्भात सर्वाधिक विकसित तालुक्याचे शहर म्हणून मूल शहराचे नाव आगामी काळात घेतले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नागरिकांनी ३५ कोटीच्या विकासकामांच्या उद्घाटनाची मॅरॉथान सायंकाळ शुक्रवारी अनुभवली. तीन तासांत शहरात ३५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्र्यांनी केले.
सर्वप्रथम ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते मूल शहराला २४ तास पाणी देण्याऱ्या २८ कोटी रुपये किंमतीच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पाणीपुरवठा योजनेसाठी पूरक ठरणाऱ्या वीज कंपनीच्या एक्सप्रेस फिडरचे उद्घाटनही करण्यात आले. त्यानंतर अडीच कोटींच्या तालुका क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे भूमिपूजन, ३ कोटी २६ लक्ष रूपये किंमतीच्या १० सार्वजनिक जागांच्या सौंदर्यीकरणाचा प्रारंभ विविध ठिकाणी करण्यात आला.
यावेळी त्यांनी शहराच्या विविध भागात पाच ठिकाणी जनतेला संबोधित केले. ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मूल शहरातील वीजपुरवठा भूमिगत करण्यात येईल. पाणीपुरवठा मुबलक व नियमित करण्यात येईल. तसेच शहरातील सर्व रस्ते सिमेंटचे व नाल्या भूमिगत करण्यात येतील. मूल शहरात सुमारे १५० कोटी रूपये किंमतीच्या विकासकामांना मंजूरी मिळाली असून यात मुख्य मार्गाच्या सिमेंटीकरणासह तसेच अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, चौक सौंदर्यीकरण, स्मशानभूमीचे बांधकाम, पाणीपुरवठा योजना, बसस्थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण, वळण मार्गाचे बांधकाम, माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांचे स्मारक व सभागृहाचे बांधकाम, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, खनिज विकास निधीच्या माध्यमातून इको-पार्कचे बांधकाम, जलतरण तलावाचे बांधकाम, शासकीय आदिवासी मुलींच्या व मुलांच्या वसतिगृहाचे बांधकाम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकाम, क्रीडा संकुलाचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अतिरिक्त कार्यशाळेचे बांधकाम, सीसीटीव्ही सर्व्हेलन्स सिस्टीम, माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, भूमिगत विद्युत वाहिनीचे बांधकाम आदी विकास कामे मूल शहरात मंजूर करण्यात आली. त्यातील बहुतांश विकास कामे प्रगतीपथावर आहेत व काही पूर्णत्वास आली आहे. नजीकच्या काळात प्रत्येक वार्डात जनता दरबार घेऊन तुमच्या मनातला विकास प्रत्यक्षात साकारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष व बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनीही मोठ्या संख्येने उपस्थितांशी संवाद साधला.
व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मूल शहर भाजपाचे अध्यक्ष प्रभाकर भोयर, नगरसेवक विनोद सिडाम, रेखा येरणे, शांता मांदाडे, वनमाला कोडापे, प्रशांत समर्थ, विद्या बोबाटे, अनिल साखरकर, आशा गुप्ता, प्रशांत लाडवे, संगीता वाळके, वंदना वाकडे, महेंद्र करकाडे, मिलिंद खोब्रागडे, प्रभा चौथाले, चंद्रकांत आष्टनकर, अजय गोगुलवार आदी उपस्थित होते.
पाच प्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन
यावेळी प्रत्येक ठिकाणी जनतेच्या पाच प्रतिनिधीकडून उद्घाटन करण्यात आले. अशा विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन मूल शहरात करण्यात आले होते. कार्यकर्त्यांची बाईक रॅली, नगरसेवक, नगरसेविकांचा त्यातील सहभाग, ज्येष्ठ नागरिकांची उदघाटनस्थळी उपस्थिती आणि शेवटी खचाखच भरलेल्या मा.सा.कन्नमवार सभागृहात जाहीर सभा, अशी व्यस्त सायंकाळ मूलवासियांनी पालकमंत्र्यांसोबत अनुभवली. पाचही ठिकाणी विद्यार्थी, महिला आणि कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. आपल्या विविध मागण्या सादर केल्या.