पाणी पुरवठ्यावरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:23 PM2017-10-30T23:23:49+5:302017-10-30T23:27:08+5:30
महानगरपालिका झाल्यानंतर पाणी पुरवठ्याच्या विद्युत दरातही वाढ झाली आहे. वाढीव दरामुळे निर्माण झालेली तफावतीची रक्कम मनपाने द्यावी, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिका झाल्यानंतर पाणी पुरवठ्याच्या विद्युत दरातही वाढ झाली आहे. वाढीव दरामुळे निर्माण झालेली तफावतीची रक्कम मनपाने द्यावी, अशी मागणी पाणी पुरवठा करणाºया उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीने केली होती. हा विषय मनपाच्या सोमवारी झालेल्या आमसभेत चर्चेसाठी ठेवताच काही नगरसेवकांनी याला विरोध केला. सत्ताधारी व विरोधकांमध्ये या विषयावरून मतभेद निर्माण झाल्याने एकच गोंधळ उडाला.
चंद्रपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी १ वाजता मनपाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. सभेला सुरुवात होताच पाणी पुरवठ्याच्या वाढीव विद्युत दरामुळे निर्माण झालेली तफावत व ती रक्कम देण्याचा विषय सभागृहासमोर ठेवण्यात आला. परंतु, या विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांतच मतभेद दिसून आला. शहराला पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट २०११ मध्ये उज्ज्वल कंस्ट्रक्शन कंपनीला हस्तांतरित करण्यात आले. नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यामुळे वीज दरात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून वाढीव वीज दराची तफावत रक्कम देण्याची मागणी पाणीपुरवठा कंत्राटदाराने प्रशासनाकडे केली आहे. यानंतर १८ डिसेंबर २०१५ मध्ये तफावत रक्कम देण्यासंदर्भात आमसभेत चर्चा झाली. त्यावेळी गुणवत्तेत सुधारणा झाल्यानंतर रक्कम देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. नंतर १९ सप्टेंबर २०१६ च्या आमसभेत नगरपालिका आणि महानगरपालिका काळातील वीज दर तपासून तफावत रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, अजूनपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे आजच्या सभेत हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला. तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत दानव यांनी करारात तफावत रक्कम देण्याचे ठरले नसल्याचे सांगत विरोध दर्शविला. आणखी काही नगरसेवकांनीही याला विरोध दर्शविला. यापूर्वी दोनदा झालेल्या ठरावाची अंमलबजावणी न करता पुन्हा तोच विषय चर्चेसाठी आणून सभागृहाचा अवमान केला जात असल्याचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी म्हटले. या विषयावरून चांगलाच गोंधळ झाल्याने महापौर अंजली घोटेकर यांनी प्रशासनाने यावर निर्णय घ्यावा, असे जाहीर केले. तसेच जुने कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटाची निविदा लवकरात लवकर काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
रेन वॉटर हार्व्हेस्टिंगची सुविधा केल्यानंतरच नवीन बांधकामाला मंजुरी देणे आवश्यक होते. परंतु, अनेक नवीन बांधकाम करताना याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा विषय सुनिता लोढिया यांनी उपस्थित केला. तेव्हा महापौर घोटेकर यांनी शहरातील सर्व नवीन बांधकामांची तपासणी करावी. रेन वॉटर हार्व्हेस्टिंगची सुविधा नसलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.आमसभेला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपायुक्त विजय देवळीकर उपस्थित होते.
पाण्याच्या टाकीची सुरक्षितता तपासणार
यानंतर नेताजी सुभाषचंद्रबोस शाळेची जीर्ण इमारत पाडून तेथे सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. वडगाव पाण्याच्या टाकीवरून सोनू सोनवणे या १९ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. त्यामुळे टाकीच्या परिसरात संरक्षण भिंत उभारून सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी नगरसेविका सुनीता लोढिया यांनी केली. तेव्हा महापौरांनी शहरातील सर्व टाक्यांची पाहणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
रामाळा तलाव परिसरात सुरक्षारक्षक
रामाळा तलाव परिसरात स्टंटबाजीमुळे दोन युवकांना जीव गमवावा लागला. मनपाने तलावाचे सौंदर्यीकरण केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे या परिसरात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गतिरोधक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोन सुरक्षारक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव या बैठकीत मंजूर करण्यात आला.
आर्थिक भुर्दंड नाही
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून महानगरपालिका पाण्याची उचल करीत आहे. त्यामुळे मलनिस्सारण योजनेंतर्गत निघणारे पाणी देण्याची मागणी वीज केंद्राने मनपाकडे केली होती. २१२ कोटींच्या एसआयटीसीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. देखभाल दुरुस्ती करणाºया कंपनीकडेच मनपाचा हिस्सा भरण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे या योजनेमुळे मनपावर कुठलाच आर्थिक भूर्दंड पडणार नसल्याचे आयुक्त विजय देवळीकर यांनी स्पष्ट केले.