देवाडा खुर्द येथील पाणीपुरवठा बंद
By Admin | Published: June 10, 2017 12:32 AM2017-06-10T00:32:43+5:302017-06-10T00:32:43+5:30
गेल्या एक आठवड्यापासून देवाडा खुर्द येथे विद्युत यंत्रणा सदोष असल्याने येथील नळ योजना बंद पडली आहे.
विजेचा लंपडाव : एका आठवड्यापासून महिलांची पाण्यासाठी पायपीट
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा : गेल्या एक आठवड्यापासून देवाडा खुर्द येथे विद्युत यंत्रणा सदोष असल्याने येथील नळ योजना बंद पडली आहे. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ही समस्या उद्भवली आहे. त्याचा स्थानिक नागरिक व महिलांना प्रचंड त्रास होत आहे. पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरु आहे. मात्र हा बिघाड एक आठवडा होवूनही दुरुस्त करण्यात वीज वितरण कंपनीला यश आले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या पायथ्याशी असलेल्या व तालुक्यात सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव म्हणून ओळख असलेल्या देवाडा खुर्द येथे अंधारी नदीच्या पायातून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. देवाडा खुर्द गावातील भूजल पातळी फार खोलवर आहे. अनेकांनी बोरवेल खोदून पाणी लागले नाही तर सोडून दिल्या आहेत. या भागात अनेक विहिरी मार्च, एप्रिल महिन्यांतच कोरड्या होतात.
या गावात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये भीषण पाणीटंचाई असते. अंधारी नदीचे पात्रसुद्धा कोरडे पडले असून त्यात काही दिवसापर्यंत पाणी पुरवठा करण्याएवढे पाणी तग धरुन आहे. अनेक महिला उन्हा-तान्हामध्ये मिळेल त्या शेतात पाण्यासाठी पायपीठ करीत आहेत. सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची कामे सुरु आहेत. मजूर सकाळी कामावरुन येऊन त्यांना परत पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. त्याबाबत वीज वितरण कंपनीच्या थंड हवा खाणाऱ्या अधिकाऱ्यांना काहीच वाटत नाही. एखादा साधा बिघाड एक आठवड्यापासून दुरुस्त करण्यास अपयशी ठरलेले हे विद्युत कर्मचारी काय कामाचे, असा सूर स्थानिक नागरिकांमध्ये काढण्यात येत आहे.
एक दिवस वीज देयक भरण्यात विलंब झाल्यास त्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. परंतु हे अधिकारी आपल्या कामात नेहमी निष्काळजीपणा करीत असतात. त्यामुळे नागरिकांना एक आठवडा त्रास सहन करावा लागतो. आपल्या कडील वीज बिल तत्काळ भरा. विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करा. अन्यथा पुरवठा खंडित करण्यात येईल, अशी दवंडीद्वारे सूचना देण्यात येते. या अधिकाऱ्यांना आपल्या कामाची मात्र काहीच जाणीव नसावी, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे. हे क्षेत्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या क्षेत्रामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे कार्यकर्ते उघड्या डोळ््यानी बघून काहीच उपाययोजना करताना दिसत नाही.
गावाशेजारी नदीचे पाणी असताना अनेक गावामध्ये पाण्याची धग कायम आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदावर आरुढ झालेले देवराव भोंगळे यांनी निवडणूकपूर्व काळात हा संपूर्ण परिसर पिंजून काढलेला आहे. या तालुक्यातील ग्रामीण भागातील स्थिती काय आहे, हे ते समजू शकतात.
त्यांनी तालुक्यामध्ये पाणीटंचाई बाबत आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. देवाडा खुर्द येथील पाणी पुरवठा एक आठवड्यापासून बंद असल्याचे काही नागरिकांनी त्यांना सांगितले आहे.
वीज वितरण कंपनीचा सुलतानी कारभार
गेला एक आठवड्यापासून या जलकुंभावरील विद्युत जोडणीमध्ये विघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक अर्ध्या तासाने विद्युतपुरवठा खंडित होत आहे. याबाबत पोंभुर्णा येथील महावितरणचे अभियंता बाघुळकर व कनिष्ठ अभियंता पाटील यांना वारंवार माहिती देऊनसुद्धा त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. केवळ रोजंदारी कर्मचाऱ्यांना पाठवून आपले हात वर करणे आणि कार्यालयामध्ये बसून थंडी हवा खाणे यातच ते धन्यता मानत असतात. पोंभुर्णा येथील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे येथील विद्युत प्रवाहात सातत्याने बिघाड होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना तब्बल एक आठवड्यापासून पाणी मिळत नाही. आधीच हा भाग पाणीटंचाईचा आहे. देवाडा खुर्दचा पाणीपुरवठा केवळ महावितरणच्या वीजपुरवठ्यामधील तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झाला आहे.