पाणीपुरवठा सुरळीत करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:31+5:302021-05-12T04:29:31+5:30
सेवा केंद्रांतून मिळणार घरपोच सेवा गडचांदूर : लॉकडाऊनमुळे संचारबंदी असल्याने तसेच राज्यातील सर्व सेवा बंद असल्याने परंतु कठीण प्रसंगी ...
सेवा केंद्रांतून मिळणार घरपोच सेवा
गडचांदूर : लॉकडाऊनमुळे संचारबंदी असल्याने तसेच राज्यातील सर्व सेवा बंद असल्याने परंतु कठीण प्रसंगी दवाखान्याच्या कामासाठी पैशांची अत्यंत गरज असल्यास त्यांना आपले सरकार केंद्रचालकांनी मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला असून प्रशासनाचेसुद्धा सहकार्य घेतल्या जाणार आहे. गडचांदूर व जिवती तालुक्यातील काही अतिगरजू किंवा संकटात असलेल्या व्यक्तीचा फोन येताच घरी जावून लाभ देणार आहेत.
गावांना रस्त्याची प्रतीक्षा
वरोरा : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागते. अनेक गावांत जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. अनेकदा रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
जुन्या वाहनांना कालबाह्य करावे
घुग्घुस : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
ढिगाऱ्यांमुळे वन्य प्राण्यांचे वास्तव
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलीने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहे. या मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल निर्माण झाल्याने वन्यप्राण्यांचा याठिकाणी वावर वाढला आहे. त्यामुळे हे मातीचे ढिगारे धोकादायक ठरत आहे.
सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपावर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथे हातपंपावर सौरऊर्जा बसविल्यास नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांतही सोय होणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा पंप बसवावे, अशी मागणी आहे.
दूरसंचार कार्यालयाची दुरूस्ती करावी
कोरपना : येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरावस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून अधिकारी व कर्मचारीही नाही. त्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जावे लागते.
केरोसीनअभावी अडचण वाढली
जिवती : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र, केरोसीन बंद झाल्याने अडचण जात आहे.
गावातील तलावांचे सर्वेक्षण करावे
चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरूस्ती केली जात नाही. मामा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे.
रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्य धोक्यात
सिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देत नसल्याचा आरोप आहे.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.