जीएमआर कंपनी परिसरातील गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा
By admin | Published: April 17, 2017 12:40 AM2017-04-17T00:40:51+5:302017-04-17T00:40:51+5:30
जीएमआर एनर्जी व जीएमआर वरलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने कंपनी परिसरातील गावांमधील नागरिकांना टँकरद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे.
उन्हाळ्याचा तडाखा : वरोरा तालुक्यातील दहा गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
वरोरा : जीएमआर एनर्जी व जीएमआर वरलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने कंपनी परिसरातील गावांमधील नागरिकांना टँकरद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. या परिसरातील गावांत सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
सध्याचा कडक उन्हाळा लक्षात येता वरोरा तालुक्यातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणविण्याची शक्यता आहे. यामुळे जीएमआर वरोरा एनर्जी व जीएमआर वरलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक बांधीलकी या उपक्रमाअंतर्गत गावातील सरपंच व सदस्यांनी मागणी केलेल्या गावामध्ये दररोज टँकरनी शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येत आहे. वनोजा गावात जीएमआर कंपनीने ट्युबवेल व पाण्याची पाईपलाईन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्याने उन्हाळ्यात वनोजावासीयांना दिलासा मिळाला आहे.
सध्या टँकरद्वारे डोंगरगाव, चरूरखटी, दहेगाव, निमसडासह दहा गावातील दहा हजार नागरिकांना दररोज टँकरद्वारे शुद्ध पाणी पुरवठा जीएमआर एनर्जी व जीएमआर वरलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे. सदर पाणी पुरवठा पावसाळ्यात सुरू होईपर्यंत करण्यात येणार आहे. मागील एक महिन्यापासून पाणी पुरवठा खंडित झाल्याने कंपनीची वीज निर्मिती बंद असतांनाही कंपनीच्या वतीने परिसरातील गावामधील नागरिक टँकरद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, हे विशेष! मात्र पुढच्या महिन्यात आणखी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)