शाफ्ट टेक्नॉलॉजी वापरून प्रथमच आष्टा येथे होणार पाणीपुरवठा
By साईनाथ कुचनकार | Published: July 6, 2023 06:59 PM2023-07-06T18:59:03+5:302023-07-06T19:02:11+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम : ग्रामस्थांमध्ये आनंद
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील आष्टा येथे शाफ्ट आधारित पाणीपुरवठा यंत्रणेद्वारे आता पाणीपुरवठा केला जाणार आहे. शाफ्ट टेक्नॉलॉजी जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असून, या टेक्नॉलॉजीमुळे शासनाच्या निधीची बचत झाली आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये अभ्यास करून या टेक्नाॅलाॅजीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाला आयआयटी मुंबईचे डॉ. सतीश अग्निहोत्री, डॉ. प्रदीप काळबर, कोल इंडिया लिमिटेडचे अजय वर्मा, पंचायत समिती भद्रावतीचे गटविकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार, ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, उपअभियंता ओकेंश दराडे, आजीवन वाॅटर लिमिटेड मुंबईचे डॉ. अनूजकुमार घोरपडे, अमोल बल्लाळ, अविनाश घोडगे, गोपाल महाजन, सरपंच चांगदेव रोडे, ग्रामसेवक भरत राठोड, विस्तार अधिकारी मनोहर कापकर यांच्यासह पंचायत समिती भद्रावती व आष्टा येथील नागरिकांची उपस्थिती होती. शाफ्ट टेक्नॉलॉजीविषयी आयआयटी मुंबई येथील प्रोफेसर डॉ. प्रदीप काळबर यांनी यावेळी माहिती देत या टेक्नॉलॉजीच्या कार्यप्रणाली विषयी सांगितले.
आभार विस्तार अधिकारी (पंचायत) मनोहर कापकर यांनी मानले. शाफ्ट टेक्नॉलॉजीला कोल इंडिया लिमिटेड, जिल्हा परिषद चंद्रपूर व ग्रामपंचायत आष्टामार्फत १० टक्के निधीमधून सहा लाख ५२ हजार ६४७ एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला. पाण्याचा खांब उभारण्यात आजीवन वाॅटर प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे यांनी मोलाचे कार्य केले असून आयआयटी मुंबईमार्फत नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.
उंचावरही जाणार पाणी
गावातील उंचावरील भागात ५० ते ६० कुटुंबांना यापूर्वी कमी दाब असल्याने नळाचे पाणी पोहोचत नव्हते. परंतु, शाफ्ट टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे गावातील उंचावरील भागातसुद्धा पाणी पोहोचण्यास मदत होणार आहे. मागील १० ते १२ वर्षांत पाणी भरण्याकरिता महिलांना भरपूर वेळ द्यावा लागत होता. एवढेच नाही तर ५ ते ६ फूट खोल खड्डे करून सुद्धा नळाला पाणी येत नव्हते. मोटारपंप लावूनसुद्धा पाणी येत नसल्याचे महिलांनी सांगितले. परंतु, आता या पाण्याच्या खांबामुळे पाणी वेळेवर व प्रेशरने येणार आहे.