तीन महिन्यांपासून बल्लारपूर, चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील वॉटर वेन्डिंग मशीन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:13+5:302021-05-15T04:27:13+5:30
बल्लारपूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲन्ड टुरिझम काॅर्पोरेशन लिमिटेडद्वारा चालविण्यात येत असलेल्या मध्य रेल्वेच्या बल्लारशाह, चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील स्वस्त ...
बल्लारपूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲन्ड टुरिझम काॅर्पोरेशन लिमिटेडद्वारा चालविण्यात येत असलेल्या मध्य रेल्वेच्या बल्लारशाह, चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील स्वस्त व थंड पाण्याची वॉटर वेंडिंग मशीन मागील तीन महिन्यांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना जादा दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने मशीन सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांना स्वच्छ आणि स्वस्त पाणी मिळावे, यासाठी आयआरसीटीसीतर्फे मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर ठेका पद्धतीने वॉटर वेंडिंग मशीन लावल्या. या मशीनमधून ५ रुपयात एक लिटर पाणी तेही शुद्ध मिळत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा कल या मशीनचे पाणी घेण्यासाठी वाढला. कारण स्टॉलवर एक लिटर पाणी १५ रुपयास मिळते व वॉटर वेंडिंग मशीनचे पाणी ५ रुपयाला एक लिटर मिळते. यामुळे सुरुवातीपासूनच प्रवाशांची हे पाणी वापरण्यासाठी गर्दी होती परंतु जेव्हापासून कोरोना संकटामुळे रेल्वे प्रवाशांची गर्दी ओसरली. त्यामुळे पाण्याची उचल कमी झाली व मशीन चालविणाऱ्याने वॉटर वेंडिंग मशीन बंद केली. दोन महिन्यांपासून बल्लारशाह स्थानकावरील ५ फलाटावरील या मशिनरी बंद असल्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
कोट
बल्लारशाह रेल्वे स्थानकावर दरवर्षी वॉटर कुलरच्या माध्यमातून थंड पाण्याची सोय असायची, परंतु यंदा नाही आहे. यामुळेही प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांचे म्हणणे आहे की, रेल्वे प्रशासन आयआरसीटीसीच्या माध्यमातून स्थानकावर रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी खासगी ठेकेदाराला देऊन स्टॉल सुरू करते; परंतु त्यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळे स्टॉलचालक मनमानी करतात व प्रवाशांची गैरसोय होते. लाईट बिल, पाणी बिल व मशीनचे भाडे निघत नसल्यामुळे मशीन बंद असल्याचे ठेकेदाराने सांगितले. काही रेल्वे प्रवासी टोल फ्री नंबरवर विचारणा करतात; परंतु तिकडून काहीच उत्तर येत नाही.
-
जयकरणसिंग बजगोती, डी आरयूसीसी, सदस्य, बल्लारपूर.