बीडीओंच्या अंगावर पाणी फेकले; ६० जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 03:48 PM2024-08-02T15:48:59+5:302024-08-02T15:50:07+5:30
आंदोलनाला गालबोट : १५ गावांची पाणीपुरवठा योजना ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा : तालुक्यातील १५ गावांना पाणीपुरवठा करणारी वेळवा ग्रीड पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांना गढुळ पाणी प्यावे लागत आहे, असा आरोप करून शिवसेना (ठाकरे) कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या अंगावर गढुळ पाणी फेकले. तक्रारीवरून पोंभुर्णा पोलिसांनी गुरूवारी (दि. १) दुपारी ६० जणांवर गुन्हा दाखल केला. या घटनेने आंदोलनाला गालबोट लागले असून पंचायत समिती प्रशासनातही खळबळ उडाली आहे.
१५ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे ३० कोटी रूपये खर्च करून वेळवा येथे ग्रीड पाणीपुरवठा योजना उभारली. मात्र मागील दीड महिन्यापासून वीज बिल न भरल्याने योजना बंद पडली आहे. तेव्हापासून १५ गावांना गढुळ व दुषित पाणी प्यावे लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अनेकदा निवेदने दिली. मात्र, प्रश्न सुटला नाही. आज शिवसेनाचे ठाकरे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांच्या नेतृत्वात पंचायत समितीसमोर घागरफोड आंदोलन झाले. यामध्ये आशिष कावटवार, सामाजिक कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे, वेळवाचे सरपंच जितेंद्र मानकर, घनोटीचे सरपंच पवन गेडाम, आष्टाचे सरपंच किरण डाखरे, थेरगावचे उपसरपंच वेदनाथ तोरे, कल्पना गोरघाटे, नगरसेविका रामेश्वरी वासलवार सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान काहींनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर घागर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेना पदाधिकारी गटविकास अधिकारी विवेक बेल्लालवार, ग्रामीण पाणी पुरवठाचे उपअभियंता विलास भंडारी यांच्याशी चर्चा करीत होते. दरम्यान काहींनी गटविकास अधिकारी बेल्लालवार यांच्या अंगावर गढूळ पाणी फेकले. त्यामुळे दालनात खळबळ उडाली. बीडीओ बेल्लालवार यांनी या घटनेची तक्रार पोलिसात केली. तक्रारीवरून शिवसेना ठाकरे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे, आशिष कावटवार, वैभव पिंपळशेंडे यांच्यासह ६० जणांवर पोलिसांनी भारतीय न्याया संहिता कलम १३२,२९६,१८९/२ नुसार गुन्हे दाखल केला.
तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठक
आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रशासनात हालचाल सुरू झाली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक जॉन्सन व पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे यांच्याशी आंदोलकांनी फोन द्वारे चर्चा केली. या प्रकरणावर समिती गठित करून ५ ऑगस्ट २०२४ रोजी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन गटविकास अधिकारी विवेक बेल्लालवार यांनी दिली.