चंद्रपूर मनपाद्वारे इरई धरणातील पाण्याचा अपव्यय
By admin | Published: April 18, 2017 12:49 AM2017-04-18T00:49:48+5:302017-04-18T00:49:48+5:30
इरई धरणातून महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्या आहेत.
जलवाहिनीला गळती : दुरूस्तीकडे डोळझाक
दुर्गापूर : इरई धरणातून महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्या आहेत. या गळत्या कित्येक वर्षांपासून तशाच कायम असल्याने अर्ध्याअधिक पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु त्या दुरूस्त करण्याकडे मनपाने डोळेझाक चालविली आहे.
वीज निर्मितीकरिता चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने खास धरणाचे बांधकाम केले आहे. यातूनच मनपा चंद्रपूर शहरासाठी पाण्याची उचल करीत असते. याकरिता इरई धरणापासून तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १२०० एम.एम. ची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. हे पाणी ११० हार्स पॉवरच्या दोन पंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविले जाते. प्रचंड गतीने पाणी जात असताना धरणाजवळच असलेल्या वीज केंद्राच्या फ्लो मीटर रूमपासून किटाळी गावापर्यंत कित्येक वर्षांपासून ठिकठिकाणी पाण्याखाली गळत्या ‘जैसे थे’च आहेत. त्या गळत्या तरोली गवताने झाकल्या गेल्या आहेत. एवढ्या भागात जिकडेतिकडे पाणी साचलेले दिसून येते. त्यानंतर कोयना गेट ते खत्री कॉलेजपर्यंतही गळत्या असून एअर व्हॉल्हही आहेत. त्या गळत्यांमधून आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात पाणी वाहून जात आहे.
प्रत्येक जलवाहिनीवर धरणाजवळ धरणातून निघणारे पाणी व प्रत्यक्ष वीज केंद्रात पोहोचणारे पाण्याचे मोजमाप करणारे फ्लो मीटर बसविलेले आहेत. हे मीटर मनपाने बसविलेले आहेत. सध्या धरणातील पाण्याची पातळी २०५.३२५ मीटर असून त्यात ८६.३५ दलघमी पाणीसाठा आहे. म्हणजे ५४ टक्के पाणी धरणात अद्यापही शिल्लक आहे. मात्र गळत्या, पाण्याचा अपव्यय व बाष्पिभवनामुळे दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गळत्यामधून २४ तास सतत पाणी वाहून जात असल्याने धरणातील जलसाठ्याला जबर फटका बसत आहे. गेल्या पावसाळ्यात धरण तुडूंब भरले होते. त्यामुळे यंदा एवढा जलसाठा शिल्लक आहे. २०१० मध्ये पाऊस न आल्याने धरणाची छोट्या तळ्यासारखी अवस्था झाली होती. त्या भीषण संकटाचा महानगरपालिकेला विसर पडला आहे. (वार्ताहर)