पाण्यासाठी महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:38 AM2019-05-17T00:38:32+5:302019-05-17T00:39:04+5:30
पिण्याचे पाणी, रोजगार हमी योजनेचे काम, घरकुल तसेच अन्य मागण्यांना घेऊन सावलीमध्ये श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात गुरुवारी रखरखत्या उन्हात नगरपंचायतीवर महिलांनी मोर्चा काठला. मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : पिण्याचे पाणी, रोजगार हमी योजनेचे काम, घरकुल तसेच अन्य मागण्यांना घेऊन सावलीमध्ये श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात गुरुवारी रखरखत्या उन्हात नगरपंचायतीवर महिलांनी मोर्चा काठला.
मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नाही. नियमित पट्टे मिळावे यासाठी अर्ज करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शहरात घरकुलाची समस्या सुद्धा कायम आहे. अनेक नागरिक आजही पडक्या घरात राहतात. नगरपंचायतला अर्ज करून नागरिक ठकले, मात्र आजही त्यांची प्रतिक्षा काही संपलेली नाही. त्यामुळे आम्हाला घरकुल केव्हा, असा प्रश्न यावेळी महिलांनी उपस्थित करण्यात आला.
तीन महिन्यांपासून रोजगार हमीचे काम देण्याची मागणी करूनही काम देण्यात येत नसल्याने मजुरांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. किमान रोजगार उपलब्ध करून द्यावा, घराचे पट्टे द्यावे, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, सावली तुकुम येथे पट्टे व अंगणवाडी मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी रामचंद हुलके, रवी नैताम, संगीता गेडाम, शांताराम आदे, गौरव शामकुले, विशाल नर्मलवार, रेशमा वाढाई, रसीका गेडाम, ज्योती राऊत, वच्छला लटारे, शीतल वाडगुरे, शुभम येरमे, शारदा खोब्रागडे यांनी मुख्याधिकारी माधुरी सलामे यांना निवेदन दिले. संचालन संगीता गेडाम, तर आभार विशाल नर्मलवार यांनी मानले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.
समस्या सोडविण्याचे आश्वासन
विविध मागण्यांना घेण्यात काढण्यात आलेल्या मोर्चामुळे प्रशासन जागे झाले असून मुख्याधिकारी, माधुरी सलामे, तसेच नगराध्यक्ष विलास यासलवार यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी दिले.
पाण्याची समस्या उग्र
विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. असे असले तरी पाण्याच्या समस्येने येथे उग्र रुप धारण केले आहे. त्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून नळाला पाणीच येत नसल्याने महिलांमध्ये संताप आहे. व्यक्त करण्यात येत आहे.