जीवघेणे ठरू शकतात पावसाळ्यातील जलजन्य आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:35 PM2018-07-07T22:35:32+5:302018-07-07T22:36:06+5:30

पावसाळ्यामुळे चंद्रपूर महानगरातील अनेक वॉर्डांमध्ये पाणी साचून राहते. या पाण्याच्या सानिध्यात विविध प्रकारच्या कृमिकिटकांची वाढ होते. यातूनच जलजन्य आजारांची बाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक, कौटुंबीक तसेच सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी.

Waterborne diseases in monsoon may be life threatening | जीवघेणे ठरू शकतात पावसाळ्यातील जलजन्य आजार

जीवघेणे ठरू शकतात पावसाळ्यातील जलजन्य आजार

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य विभागाचा इशारा : निरोगी आरोग्यासाठी नागरिकांनी घ्यावी काळजी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पावसाळ्यामुळे चंद्रपूर महानगरातील अनेक वॉर्डांमध्ये पाणी साचून राहते. या पाण्याच्या सानिध्यात विविध प्रकारच्या कृमिकिटकांची वाढ होते. यातूनच जलजन्य आजारांची बाधा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक, कौटुंबीक तसेच सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी. आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने रूग्णालयात उपचारावे, अशी माहिती महानगरपालिका तसेच जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली़
पावसाळ्यात अतिसाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते. दिवसातून तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ पाण्यासारखे शौचाला गेल्यास त्याला ‘अतिसार’ असे म्हणतात. हा आजार प्रामुख्याने दुषित पाण्यापासून होतो. बोली भाषेत ‘जुलाब’ असेही म्हणतात. विविध प्रकारचे विषाणू, जीवाणू तसेच इतर परजिवींमुळे हा आजार होतो. या आजारामध्ये प्रथम जुलाब सुरू होवून त्यानंतर उलट्या होतात. कॉलरामध्ये पाणी अथवा भाताच्या पेजेसारखा पातळ जुलाब होतो़ या आजारामध्ये निर्जलीकरण अत्यंत वेगात होते. गॅस्ट्रो हा आजार वेगवेगळया प्रकाराच्या जीवाणू व विषाणुमुळे होतो. या आजारात उलट्या व जुलाब एकाच वेळी सुरू होतो. जुलाब वांत्या चालू आहेत़ पण जलशुष्कता नाही, अशावेळी क्षारसंजीवनी, पेज अथवा सरबतचा वापर करावा. जलशुष्कतेची लक्षणे असल्यास क्षारसंजीवनी व घरगुती पेय द्यावी. तीव्र जलशुष्कता असल्यास रूग्णास नजिकच्या प्राथमिक आरोगय केंद्रात उपचारासाठी भरती करावे. झिंक टॅबलेटमुळे अतिसाराचा कालावधी २५ टक्क्याने कमी होतो. उलटीचे प्रमाणही घटते, अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली़ जलशुष्कता कमी करण्याबरोबर अ‍ॅन्टीबायोटिक्सची योग्य मात्रा द्यावी. यासोबतच शुद्ध पाणी पुरवठा, वैयक्तिक स्वच्छता, मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावावी. बालकांना गोवर प्रतिबंधात्मक लसिकरण करणे अतिसाराच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे. कॉलरा हा आजार व्हिब्रीओ कॉलरा या विशिष्ट जीवाणुमुळे होतो. व्हिब्रीओ कॉलरा या जीवाणूचा आतड्याला संसर्ग झाल्याने पटकी हा आजार होतो. हा आजार सर्व वयांमधील स्त्री पुरुषांमध्ये आढळतो. रुग्णांच्या विष्ठेचा पाण्याच्या स्त्रोतांशी संपर्क आल्यानंतर हे जंतू पाण्यामध्ये वाढतात. यातून आजाराचा प्रसार होतो़ अशुद्ध पाणी पिणे वा स्वयंपाकासाठी वापरल्यास या आजाराचा प्रसार अतिवेगाने पसरतो़ मलनिसारणातील योग्य पद्धतीच्या अभावामुळे रुग्णांच्या विष्ठेचा पाण्याच्या स्त्रोतांशी संपर्क येवून आजाराचा प्रसार होतो़ पटकीचा अधिकाधित कालावधी काही तास ते पाच दिवस असा आहे. पटकी आजार झाल्यास पेजेसारखे वारंवार जुलाब, उलट्या होतात़ ठोके वाढतात़ तोंडाला कोरड पडते़ वारंवार तहान लागते़ स्नायूंमध्ये गोळे येतात़ अस्वस्थ वाटून चक्क येऊ शकते़ पावसाळ्यात ही लक्षणे दिल्यास आरोग्य केंद्रात दाखल व्हावे़ जेवणापूर्वी बालकांचे हात नेहमी साबणाने धुवून द्यावेत़ स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा बाळाला भरविण्यापूर्वी मातांनी विशेष काळजी घ्यावी़ जुलाब असलेल्या रुग्णाची सुश्रुषा केल्यानंतर साबण उपलब्ध नसेल तर राखेनेदेखील हात स्वच्छ करता येते़ बालकांचे गोवर प्रतिबंधात्मक लसिकरण अतिसाराच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे. मातांनी बाळाला तातडीने रुग्णालयात आणावे, असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळविले आहे़
संसर्गजन्य आजार
लेप्टोस्पायरोसीस हा प्रामुख्याने जनावरात आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. लेप्टोस्पायरा या जीवाणूच्या २३ प्रजाती आहेत. उंदीर, घुशी व अन्य पाळीव प्राण्यांमुळे आजाराचा प्रसार अधिक जोमाने होतो. हा आजार विशिष्ट हंगामामध्ये आढळून येतो़ प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि शेवटी आजाराची लागण होते़ या आजाराचे तुरळक रुग्ण वर्षभरात दिसून येतात.
पाणी उकळूनच प्या
दुषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होतात़ दूषित झालेला परिसर हाही आजारांचा प्रमुख स्त्रोत असतो. केवळ बालकच नाही तर व्यक्तींनीदेखील पिण्याचे पाणी उकळूनच प्राशन करावे़ खुप दिवसांचे पाणी साठवून ठेवू नये़ स्वयंपाक घरातील वस्तुंची स्वच्छता ठेवावी़ पालेभाज्या तसेच अन्य पदार्थ घरी आणल्यानंतर योग्य काळजी घ्यावी़ पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निरोगी राहतील, याकडे विशेष लक्ष द्यावे़
घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा
घर व परिसराची स्वच्छता ठेवली नाही तर अनेक आजार होतात़ रोगबाधित प्राण्यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. लघवीने दूषित झालेले पाणी, माती व पालेभाज्यांचा व्यक्तींशी संपर्क आल्यास लेप्टोस्पायरोसीस आजाराची लागण होते़ पर्यावरणात झपाट्याने होणारे बदल, रासायनिक खतांद्वारे केलेली शेती आदी अनेक कारणांमुळे लेप्टोसारखा प्राणिजन्य आजार होण्याचा धोका आहे. प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा सुगीच्या काळात या आजाराचे रुग्ण आढळतात. दूषित प्राण्यांच्या मलमूत्रामुळे दूषित झालेला परिसर हा या आजाराचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी स्वच्छतेकडे कदापि दुर्लक्ष करू नये़ लक्षणे दिसल्यास शासकीय रुग्णालयात उपचार करावे़

Web Title: Waterborne diseases in monsoon may be life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.