वैद्यकीय शिबिरातून कोरोनामुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:21+5:302021-06-05T04:21:21+5:30
गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचांदूर येथील पूजा संतोष टोंगे हिने समाजापुढे एक नवा ...
गडचांदूर : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचांदूर येथील पूजा संतोष टोंगे हिने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जन्मगाव टाकळी येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. ८५ घरांच्या गावात जवळ - जवळपास ६० हून अधिक घरात कोरोना विषाणूचा प्रसार झाला. अचानक वाढलेले रुग्ण आणि त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधांची निकड निर्माण झाली असताना पूजाने आवश्यक वैद्यकीय सामग्रीसाठी लोकसहभागातून निधी उभा करत कोरोनाग्रस्त टाकळी गावात वैद्यकीय तपासणी व औषधोपचार देण्याचा निश्चय केला.
प्रशासकीय परवानगीने १४ मे रोजी आयुर्वेदिक डॉक्टर्सचा चमू गावात जाऊन कोव्हिड १९ बद्दल जनजागृती केली. त्यानंतर १५ मे रोजी ११० गावकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात ६० हून अधिक कोरोना होऊन गेलेल्या मात्र अनेक तक्रारींनी बेजार असणाऱ्या रुग्णांचा सहभाग होता. सर्व रुग्णांवर आयुर्वेदिक पध्दतीने उपचार करण्यात आले. पुन्हा १७ व २४ मे रोजी गावात वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. तेव्हा रुग्णांच्या तब्येतीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसू लागली होती. या दरम्यान रुग्णांचे शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलन करण्यात आले. नुकतेच गावात वैद्यकीय समारोपीय शिबिर पार पडले. आयुर्वेदिक उपचारांचा रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसल्याचे जाणवले.
ग्रामीण भागात आयुर्वेदिक पध्दतीने कोरोनाग्रस्तांवर प्रभावीपणे उपचार केला जाऊ शकतो. कोव्हिड, कोव्हिड पश्चात व नॉन कोव्हिड अशा एकूण जवळपास १५० रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी व आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात आली, अशी माहिती नागपूरचे डॉ. रचनील कमाविसदार यांनी दिली. या कामात पुण्यातील डॉ. प्रयाग सेठिया, डॉ. भाग्यश्री जिबकाटे, डॉ. राऊत, प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थानिक डॉक्टर्स, आशा वर्कर्स भगत आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याने केलेल्या कामाचे समाधान वाटले. मी माझे सामाजिक कर्तव्य जाणून वैद्यकीय सेवेच्या कामात पुढाकार घेतला, असे मत पूजा टोंगे यांनी प्रतिपादित केले. यावेळी प्रतिष्ठित नागरिक सुरेश काकडे, संतोष टोंगे, दशरथ बोबडे, दिलीप भगत, ॲड. दीपक चटप, रुपेश ठाकरे, सरपंच ज्ञानेश्वर टोंगे, अरविंद तरवटकर, काशिनाथ झाडे, अनिल गुप्ता, महेश बंडेकर, प्राजक्ता बाेबडे, विक्रम झाडे, ग्रामसेवक शेख, सुनील वडस्कर, विक्रम रायसिडाम आदींची उपस्थित होती.