वेकोलिचे ओव्हरबर्डन उठताहेत जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:10 AM2017-11-30T00:10:45+5:302017-11-30T00:14:21+5:30
मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे.
रवी जवळे।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील वेकोलि प्रशासन राज्य शासन, जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे. वेकोलिने आपल्या प्रदूषणाने नागरिकांचे आयुष्यच कमी करून टाकले आहे. चंद्रपूरलगत वेकोलिने भलेमोठे ओव्हरबर्डन केले आहे. जिल्हा प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी वेकोलिला ओव्हरबर्डन तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र आजही वेकोलिचे ओव्हरबर्डन उभेच आहे. आता पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला आहे. आणखी उन्हाळा शिल्लक आहे. त्यामुळे वेकोलिने या कालवधीत हे ढिगारे काढावे, अशी मागणी केली जात आहे.
चंद्रपूरलगत असलेल्या माना खाण परिसरात व इरई नदीपात्रालगत वेकोलिने मातीचे मोठमोठे ढिगारे तयार केले आहे. वर्षांनुवर्षापासून याच ठिकाणी माती टाकण्यात येत असल्यामुळे हे ओव्हरबर्डन महाकाय झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे इरई नदीचे नैसर्गिक पात्र बदलले आहे. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांना नेहमीच बॅकवॉटरचा सामना करावा लागतो व पूरपरिस्थिती निर्माण होते. ४० टक्के चंद्रपूरकरांना याचा नेहमी फटका बसतो. यंदा पाऊस अत्यल्प पडला. पूरपरिस्थिती उदभवली नाही. तरीही या प्रकाराकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात माजरीपासून सास्तीपर्यंत वेकोलिच्या खदानी आणि त्यांनी उभे केलेले ओव्हरबर्डन दिसून येतात. दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकाºयांमार्फत वेकोलिला सदर ओव्हरबर्डन तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र वेकोलिने या संदर्भात कुठलेही पाऊल उचलले नाही. महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांनी ३१ मार्च २०१४ रोजी एक तातडीची बैठक घेऊन ओव्हरबर्डन हटविणे व संरक्षक भिंत बांधणे यावर चर्चा केली होती. याला आज तीन वर्षांचा कालवधी लोटला आहे. मात्र या संदर्भात अद्याप काहीही होऊ शकले नाही, हे चंद्रपूरकरांचे दुर्दैव.
सध्या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी हे काम हातात घेण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात हे काम बंद करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा इरई नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू होणार आहे. वेकोलिनेही आपले ढिगारे काढले तर पावसाळ्यात पुराची भीती कमी होईल.
उल्लेखनीय असे की निरीच्या चमूनेही चंद्रपूरच्या प्रदूषणाची पाहणी केली असता त्यांनीही वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे पूरपरिस्थिती व प्रदूषण होत असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेकोलिला नोटीस देऊन सदर ढिगारे ४५ मीटरपर्यंत हटविण्यास सांगितले होते.
जिल्ह्यात केवळ मुंगोली, बल्लारपूर व पद्मापूर येथेच नदीचा गाळ काढून ढिगारे हटविण्याचा अल्पसा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला होता. परंतु चंद्रपुरात पुरासाठी कारणीभूत असलेले माना खाणीमुळे निर्माण झालेले ढिगारे अद्याप हटविण्यात आले नसल्याचे दिसते.
कायद्याचा विसर
जल प्रदूषण कायदा १९७४ कलम ३३ प्रमाणे कोळसा खाणीचे प्रदूषित पाणी नदीत किंवा नाल्यात सोडता येत नाही. पूर रेषेच्या आत ढिगारे ठेवता येत नाही. त्यासाठी मजबुत संरक्षक भिंत बांधावी लागते. दूषित पाणी साठविण्यासाठी तळे आणि ओव्हरबर्डनवर वृक्षारोपण करावे लागते. परंतु वेकोलिने कधीच याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे चंद्रपूर सातत्याने प्रदूषित होत राहिले व पुराचा सामना करीत राहिले.
ढिगाऱ्यावर वन्यजीवांचा वावर
वेकोलिचे काही ओव्हरबर्डन शहराच्या काही अंतरावरच उभे आहेत. या ढिगाऱ्यावर झुडुपे वाढली आहेत. यात बिबट, अस्वल, रानडुकरे यासारखे वन्यप्राणी दडून बसण्याची शक्यता असते. यापूर्वी माना टेकडी परिसरात बिबट्याचा वावर अशाच ढिगाºयात असल्याचे स्पष्ट झाले होते.
वेकोलिने वर्धा नदीपात्राजवळ ओव्हरबर्डन उभे केले आहे. नदीजवळचे ओव्हरबर्डनमुळे नदीतील पाणी दूषित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मागे हे ओव्हरबर्डन हटविण्याचे निर्देश दिले होते. मात्र वेकोलिने थातूरमातूर कार्यवाही केली. सुरक्षा भिंतही बांधली नाही.
- सुरेश चोपणे, अध्यक्ष ग्रिन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर.
नदीपात्रापासून ५० मीटर अंतरापर्यंत ओव्हरबर्डन नसले पाहिजे. वेकोलिला बाऊंडरी वॉल बांधायचे आधीच निर्देश दिले आहेत. आपण सध्या शहराबाहेर आहोत. आल्यावर याबाबत चौकशी करून पुढील कार्यवाही करता येईल.
-आशुतोष सलील,
जिल्हाधिकारी, चंद्रपूर.