ऑनलाइन सफारी बुकिंगच्या नावाखाली ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला १२ कोटींनी गंडवले, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 10:51 AM2023-08-19T10:51:52+5:302023-08-19T10:56:47+5:30
टीएटीआरला भरणा न करता आरोपींनी शासकीय रकमेचा अपहार : डब्ल्यूसीएस कंपनी संचालकासह भागीदारावर गुन्हा
चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने ताडोबा सफारीच्या बुकिंगसाठी करार केलेल्या डब्ल्यूसीएस कंपनीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची तब्बल १२ कोटी १५ लाख ५० हजार ८३१ रुपयांनी फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या विभागीय वनाधिकाऱ्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी डब्ल्यूसीएस कंपनीचे अभिषेक विनोदकुमार ठाकूर, रोहितकुमार विनोदसिंग ठाकूर (दोघेही रा. प्लॉट क्र. ६४, गुरुद्वारारोड, चंद्रपूर) यांच्याविरुद्ध कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्रदर्शनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. येथे देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. ताडोबा सफारीसाठी पर्यटकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन बुकिंगसाठी वेबसाइट उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि. १० डिसेंबर २०२१ रोजी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचे ऑनलाइन बुकिंग करण्याकरिता रोहितकुमार ठाकूर चंद्रपूर वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन व कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यांच्यादरम्यान पाच वर्षांसाठी कायदेशीर करार झाला आहे. तथापि, संस्थेच्या पार्टनर्सने करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याची बाब ताडोबा व्यवस्थापनाच्या निदर्शनास आली.
याआधारे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर (टीएटीआर)ने सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व सन २०२३-२४ या वर्षांचे ऑडिट केले. त्या ऑडिट अहवालानुसार नमूद कालावधीमध्ये आरोपीत कंपनी / संस्थेने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यांना २२ कोटी ८० लाख ६७ हजार ७४९ देणे होते. त्यापैकी त्यांनी १० कोटी ६५ लाख १६ हजार ९१८ रुपयांचा भरणा केलेला आहे. सफारी बुकिंगची उर्वरित रक्कम १२ कोटी १५ लाख ५० हजार ८३१ रूपये टीएटीआरला भरणा न करता आरोपींनी शासकीय रकमेचा अपहार केला. ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी सचिन उत्तम शिंदे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार केली.
याप्रकरणी रामनगरचे सहायक पोलिस निरीक्षक नरोटे यांनी अभिषेक विनोदकुमार ठाकूर, रोहितकुमार विनोदसिंग ठाकूर या दोघांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे (आयपीएस) आयुष नोपानी करीत आहेत.
ताडोबाने केले नवे संकेतस्थळ सुरू
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या बुकिंगकरिता सुरुवातीला www.mytadoba.org, https://booking.mytadoba.org हे संकेतस्थळ होते. मात्र ७ ऑगस्टपासून ताडोबाने हे संकेतस्थळ तत्काळ बंद केले. दि. १७ ऑगस्टपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीकरिता www.mytadoba.mahaforest.gov.in हे नवे संकेतस्थळ सुरू केले आहेत.