आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 05:00 AM2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:00:50+5:30
देशसेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त जवानांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केली जाते. मात्र, देशाच्या सीमेवर सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांची नेमकी संख्या किती याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त स्वातंत्र्यसैनिकांची नावे व त्यांच्यावरी अवलंबित निवृत्तीधारकांच्या नावांची नोंद आहे. शिवाय केंद्र व राज्य शासनाकडून सन्मानधन स्वीकारणाऱ्या १७ अवलंबित निवृत्तीधारकांचीही नोंदणी आढळली.
राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ‘आमचे काम अत्यंत अवघड होते. आम्ही जिथे कार्यरत होतो तो भाग म्हणजे हाडे गोठविणारा थंड प्रदेश. डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण केले. शत्रूकडून गोळ्यांचा वर्षाव झाला तरी ठाणे सोडले नाही. आपला सहकारी शहीद झाल्याचे दु:ख मनात दडवून शत्रुवर चाल करणे हेच आमचे जीवनध्येय’ हे निवृत्त जवानांचे प्रतिनिधिनिक मनोगत ऐकले की ‘आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची’ या ओळीची स्वातंत्र्यदिनी आठवण पुढे येते.
भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेला अखेरचा लढा ‘चले जाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांना अखेरचा इशारा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी ‘भारत छोडो’, ‘चले जाव’ हा नारा दिला. जनमानसाची पकड घेणाऱ्या या नाऱ्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातही पडले. देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यातून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासोबतच स्वातंत्र्यानंतर देशसेवा करणाऱ्या जवानांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञ असणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जिल्ंह्यातील स्वातंत्र्यसैनिकांची इतिहासाने नोंदही घेतली आहे. देशसेवा करून जिल्ह्यातील १ हजार १८८ जवान निवृत्तीचे जीवन जगत आहेत. आतापर्यंत सुमारे अडिच हजारहून जास्त भूमिपूत्रांनी देशसेवा केली. देशसेवेत अमुल्य योगदान देणारे सुभेदार शंकर नेंगरे हे शौर्यचक्र पुरस्काराचे मानकरी आहेत.
जिल्ह्यात दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या ३२७ आहे. सैन्य दलातील जवानांच्या दोन वीरमाताही आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली.
सेवारत जवानांची व्हावी नोंद
देशसेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त जवानांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केली जाते. मात्र, देशाच्या सीमेवर सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांची नेमकी संख्या किती याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त स्वातंत्र्यसैनिकांची नावे व त्यांच्यावरी अवलंबित निवृत्तीधारकांच्या नावांची नोंद आहे. शिवाय केंद्र व राज्य शासनाकडून सन्मानधन स्वीकारणाऱ्या १७ अवलंबित निवृत्तीधारकांचीही नोंदणी आढळली.
भारतीय सैन्यात वाढावा जिल्ह्याचा टक्का
सैन्यातून कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या जवानांची संख्या १ हजार १८८ आहे. युवक-युवतींनी सैन्यात जावे, यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रोत्साहन दिले जाते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कॅप्टन दीपक लिमसे सातत्याने प्रयत्नरत आहेत. मात्र, जिल्ह्यातील युवक-युवतींचा सैन्य दलातील टक्का वाढला नाही.
निवृत्त सैनिकांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात. शिवाय, युवक-युवतींनी सैन्यदलात जावून देशसेवा करावी, याकरिताही मार्गदर्शन केले जाते. जिल्ह्यातील कार्यरत जवानांची नोंद या कार्यालयात होत नाही.
- दिनेशकुमार गोवारे,
जनमाहिती अधिकारी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर