आम्ही शासक नसून जनतेचे सेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:04 PM2019-08-04T23:04:23+5:302019-08-04T23:05:02+5:30
आम्ही शासन नसून जनतेचे सेवक आहोत. राज्यातील जनता माझे दैवत आहे. या दैवतांचे दर्शन घेण्यासाठीच आपण ब्रह्मपुरीला आलो असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : आम्ही शासन नसून जनतेचे सेवक आहोत. राज्यातील जनता माझे दैवत आहे. या दैवतांचे दर्शन घेण्यासाठीच आपण ब्रह्मपुरीला आलो असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार अशोक नेते, ना. परिणय फुके, आ. कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, आ. सुरजितसिंग ठाकूर, आ. क्रीष्णा गजबे, प्रणाली मैद, दीपाली मेश्राम, धनराज मुंगले, वसंत वारजुकर, संजय गजपुरे, क्रीष्णा सहारे, तंगडपल्लीवार, नानाजी तुपट आदींची यावेळी उपस्थिती होती.
शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे. मागील पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सरकारने मदत केली आहे. धान उत्पादकांना दिलासा दिला आहे. जलयुक्त शिवार, तलाव खोलीकरण, गोसीखुर्द प्रकल्प आदींवर समाधानकारक कामे झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रस्ते निर्मिती, विद्यार्थी, ओबीसी आरक्षण यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी खासदार अशोक नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी मनोगत व्यक्त केले आहे. प्रास्ताविक आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.
सभास्थळ ते रेल्वे गेटपर्यंत रथयात्रा
सभास्थळ ते रेल्वेगेट असा दोन किमी प्रवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, खासदार अशोक नेते व माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी खुल्या रथावर उभे राहून अभिवादन केले.
काँग्रेस कार्यालयासमोर बंदोबस्त
महाजनाजेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री ब्रह्मपुरी दाखल झाले होते. दरम्यान, आज काँग्रेस कार्यालयासमोर महाराष्ट्र युवतीकाँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी मैत्री दिन कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच रक्षाबंधन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठकही बोलावली असल्यामुळे मोठ्या संख्येने येथे कार्यकर्ते जमले होते. दरम्यान, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.