लोकशाहीची नीतिमूल्ये टिकविण्यासाठी पेटून उठण्याची गरज - विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 12:47 PM2023-04-15T12:47:37+5:302023-04-15T12:48:39+5:30
क्रांतिभूमी चिमुरात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम
चिमूर (चंद्रपूर) : देशात हुकूमशाहीची मुहूर्तमेढ रोवण्याचा मानस अंगीकारत धर्मा- धर्मात, जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी विषाचे बीज पेरले जात आहे. ‘मुह मे राम, बगल मे छुरी’ अशी दुटप्पी भूमिका ठेवणाऱ्या मनुवादी विचारांमुळे देश गुलामगिरीच्या वाटेवर लोटला जात आहे. संविधानातील लोकशाहीची नीतिमूल्ये जर टिकवायची असतील तर बहुजन नायक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पेटून उठण्याची गरज आहे, असे परखड मत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
ते क्रांतिभूमी चिमूर येथील नेहरू विद्यालयाच्या पटांगणात क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बोलत होते. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस (ग्रामीण) कमिटी, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण (ओबीसी /अनुसूचित) जाती विभाग व कौमी एकता नवजवान कमिटी चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, चंद्रपूर काँग्रेस (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, ओबीसी विभागाचे जेसाभाई मोटवानी, अनुसूचित जाती सेलचे प्रफुल खापर्डे, चिमूर विधानसभा क्षेत्र काँग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे, जिल्हा महासचिव गजानन बुटके, गजानन गुरपुडे, विनोद बोरकर, खेमराज मरस्कोल्हे, प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर, सिंदेवाही काँग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, कौमी एकता नवजवान कमिटी चिमूरचे अध्यक्ष जावा शेख, चुनीलाल कुडवे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर प्रसिद्ध नाट्य कलावंत तथा गायक अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनात्मक ‘मी वादळ वारा’ हा बहारदार भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला.