नागभीडचा विशेष कृती आराखड्यात समावेश करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:25 AM2019-07-29T00:25:35+5:302019-07-29T00:27:00+5:30
संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाकरिता आपण कायम कटिबद्ध असून नागभीड तालुक्याचा विकासाच्या विशेष कृती आराखड्यात समावेश करू, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाकरिता आपण कायम कटिबद्ध असून नागभीड तालुक्याचा विकासाच्या विशेष कृती आराखड्यात समावेश करू, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. नागभीड येथे शनिवारी आयोजित नगर परिषद कार्यालयाच्या स्थानांतर कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, चिमूरचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया, सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, नागभीड नगर परिषदेचे अध्यक्ष उमाजी हिरे, बल्लारपूर नगर परिषदेचे अध्यक्ष हरिष शर्मा हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे मी पुस्तके वाचतो, त्याप्रमाणे लोकांचे चेहरे वाचता येते. लोकांची अपेक्षा नेमक्या काय आहेत, ते सहज कळते. त्यामुळे नागभीडवासीयांची बसस्थानकाची मागणी पूर्ण करण्यासाठी लवकरच शासनाचा आदेश काढू. तसेच तालुक्याच्या विकासाकरिता राज्याच्या विशेष कृती आराखडयात नागभीडचा समावेश करू.
जिल्ह्याला गॅसयुक्त करून चुलमुक्त व धुरमुक्त करण्याकरिता शंभर टक्के गॅस कनेक्शन अभियान सुरू केले. तर बीपीएलधारकांना दोन रुपये व तीन रुपयेप्रमाणे किलो अन्न धान्य मिळत आहे. तसेच एपीएल धारकांनाही त्याच किमतीत अन्नधान्य मिळावे, याकरिता शंभर टक्के शिधापत्रिका वाटप व शंभर टक्के अन्नधान्य वाटप मोहीम जिल्ह्यात राबवली जात आहे. जिल्ह्यात सध्या परिवहन महामंडळाच्या जुन्या २५० बसेस कार्यरत आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या सहकार्याने जिल्ह्याला २०० नवीन बसेस प्राप्त होणार आहे. त्यापैकी ५० बसेसचे लोकार्पण २९ जुलै रोजी बल्लारपूर येथे होणार आहे. अर्थसंकल्पात विधवा, निराधार, परितक्तया, घटस्फोटीता महिलांचे सहाशे रुपयांचे अनुदान बाराशे रुपयापर्यंत वाढवलेले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब भूमातेच्या चरणी अर्पण करून जिल्ह्याला पाणीदार बनवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू असून त्याला जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही भाषणे झाली. आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी आपल्या मतदार संघातील विविध विकासकामांचा आढावा घेतला.
नागभीडच्या विकासासाठी कटिबद्ध- भांगडिया
नागभीडच्या विकासासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. येथील काही लोकांचा विरोध पत्करून नगर परिषद आणली. या नगर परिषदेसाठी आतापर्यंत ज्या प्रकारे होईल, त्या प्रकारे निधी आणला. पाणी पुरवठा योजनेस मंजुरी आणली. रस्त्यासाठी निधी आणला.आणि यापुढेही नागाभीडच्या विकासासाठी जे जे शक्य आहे, ते ते करण्याचा माझा प्रयत्न असेल, त्यासाठी मी कटीबध्द आहे, असे प्रतिपादन आ. कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांनी यावेळी केले.
बेरोजगारी दूर करण्यासाठी ५०० कोटींची योजना
जिल्ह्यातील बेरोजगारी नष्ट करण्याकरिता बचत गटाचे सक्षमीकरण करण्याकरिता ५०० कोटींची योजना तयार केलेली आहे. जो दुसऱ्याचे स्वप्न साकार करण्याकरिता काबाडकष्ट करतो, अशा बांधकाम कामगारांना मोफत घरे देण्यात येणार आहे. अनुसूचित जमातीच्या घरकूल योजनेतील घरांची संख्या सात हजार तर आदिवासी घरकूल योजनेतील घरांची संख्या वाढविण्याकरिता आदिवासी मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. तसेच ओबीसी बांधव घरकुलापासून वंचित राहू नये, याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री यांच्याशी चर्चा करून राज्यासाठी १९ लक्ष घरे मंजूर केलेली आहे. सोबतच जिल्ह्यातील ८० टक्के दिव्यांग असणाऱ्या बांधवांना घरकूल योजना राबवण्यासाठी अर्थसंकल्पात शंभर कोटीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.