वनविभागाच्या संपत्तीला रोजगार देणारे केंद्र बनवू
By admin | Published: July 26, 2016 01:04 AM2016-07-26T01:04:37+5:302016-07-26T01:04:37+5:30
जलयुक्त शिवारसोबतच वनयुक्त शिवाराची संकल्पना राज्यात राबविली जाणार आहे.
सुधीर मुनगंटीवार : पोंभूर्णा इको-पार्कच्या भिंतीचे भूमिपूजन
चंद्रपूर : जलयुक्त शिवारसोबतच वनयुक्त शिवाराची संकल्पना राज्यात राबविली जाणार आहे. वृक्ष लागवडीला यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. राज्यातील उघड्या टेकड्या हिरव्यागार करण्याच्या प्रयत्न असून वनविभागाच्या संपत्तीला रोजगार देणारे केंद्र बनविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पोंभुर्णा येथे इको-पार्कच्या संरक्षक भिंतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. वनविभागाच्या कोणत्याही कामाचे भुमिपूजन किंवा शुभारंभ विभागातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या हाताने करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचारी वामन गेडाम व तानाजी रोहनकर यांच्या हस्ते झाले असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीस केली.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे, पोंभुर्णाचे नगराध्यक्ष गजानन गोरंटीवार, जिल्हा परिषद सदस्य अल्का आत्राम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे आदी उपस्थित होते.
पोंभुर्णा शहरानजीक खनिज विकास निधीतून ९ हेक्टरवर २ कोटी ८३ लक्ष खर्च करून सदर पार्क तयार करण्यात येणार आहे. सदर पार्क वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. राज्यभर वनविभागाची मोठ्या प्रमाणावर संपत्ती आहे. या संपत्तीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होवू शकतो, परंतु त्यादृष्टीने यापुर्वी प्रयत्नच केले गेले नाही. आता मात्र यावर भर दिला जात असून तसे नियोजनही केल्या जात आहे. पोंभुर्णा ते आक्सापूर हा राज्यातील अत्याधुनिक असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता होणार असल्याचेही ते म्हणाले. पोंभुर्णा येथे पहिले टेलीमेडीसीन केंद्र बनविण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तुळशीराम दुधकोर या तेंदु मजूरास धनादेशाचे वितरण करण्यात आले. पार्क परिसराची पाहणी करून पालकमंत्र्यांनी वृक्षारोपनही केले. (स्थानिक प्रतिनिधी)
तीन ठिकाणी उत्तमराव पाटील वनउद्याने
जिल्ह्यात तीन ठिकाणी उत्तमराव पाटील वनउद्यानाची निर्मिती केली जात आहे. पोंभुर्णासह तीन ठिकाणी इको-पार्क तयार केले जात आहे. बॉटनिकल गार्डनचाही प्रस्ताव आहे. जिल्ह्यात जैवविविधतेचा अभ्यास करणारे उद्याने निर्माण केली जाणार आहे. निसर्गाने दिलेल्या जैवविविधतेचे जिल्हा ज्ञानसाधना केंद्र बनतील, असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले.