चंद्रपुरातील हवामान मापक केंद्र सदोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:15 AM2019-04-26T00:15:20+5:302019-04-26T00:15:56+5:30
चंद्रपूरचा उन्हाळा राज्यभर प्रसिध्द आहे. राज्यातील व विदर्भातील सर्वाधिक तापमान अनेकवेळा चंद्रपुरातच नोंदविले जाते. मात्र या तापमान नोंदीबाबत चंद्रपुरातील पर्यावरणवादीच साशंक आहेत. चंद्रपूर शहराचे तापमान कधी कमी तर कधी अधिक नोंदविले जात आहे.
रवी जवळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरचा उन्हाळा राज्यभर प्रसिध्द आहे. राज्यातील व विदर्भातील सर्वाधिक तापमान अनेकवेळा चंद्रपुरातच नोंदविले जाते. मात्र या तापमान नोंदीबाबत चंद्रपुरातील पर्यावरणवादीच साशंक आहेत. चंद्रपूर शहराचे तापमान कधी कमी तर कधी अधिक नोंदविले जात आहे. कारण मुळात चंद्रपुरात हवामान मापक केंद्र जिथे आहे, ते स्थळच चुकीचे आहे. त्यामुळे योग्य तापमानाची नोंद होत नाही, असा पर्यावरणवाद्यांचा आरोप आहे. याबाबत तक्रारीही झाल्या आहेत. स्थळ बदलविण्याची मागणीही झाली. मात्र चंद्रपूरच्या तुकूम परिसरात असलेल्या हवामान मापक केंद्राच्या स्थानांतरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलाच आहे.
चंद्रपूर शहर तीव्र तापमान आणि प्रदूषणामुळे राज्यभरात चर्चेत असते. येथील उन्हाळ्याची धडकी अनेक शहरातील नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेरगावातील नागरिक चंद्रपुरात यायला घाबरतात. उन्हाळ्यात ४७ अंशापार तापमान गेले असते. असा अनुभव चंद्रपूरकरांनी अनेकदा घेतला आहे. इतर शहराच्या तुलनेत चंद्रपूरचे तापमान अधिक का, याबाबत पर्यावरणवादी व सुज्ञ नागरिकांमध्ये अनेकदा चर्चा झाली. कारणीभूत असलेल्या अनेक बाबी पुढे आल्या. त्यात जंगलाचा ºहास, औद्योगिकीकरण, वाढते प्रदूषण आदींचा समावेश आहे. मात्र चंद्रपुरातील केंद्रात नोंदविण्यात येत असलेले तापमान चुक की अचुक याबाबतच आता चर्चा केली जात आहे.
ब्रिटिश राजवटीपासून चंद्रपुरात तापमान नोंदविण्यात येत आहे. त्याकरिता ब्रिटिशांनी तुकूम परिसरात हवामान मापन केंद्राची स्थापन केली आहे. ते केंद्र आता भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत भारत मौसम विज्ञान विभागाकडे सोपविण्यात आले आहे. त्या केंद्रातील तापमान व पावसाच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतल्या जातात. या केंद्राची स्थापना करताना तुकूम परिसरात लोकवस्ती नव्हती. आता तेथे अतिक्रमणासह उंच इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे.
या ठिकाणी आता दाट वस्ती निर्माण झाली आहे. दाट वस्ती व उंच इमारतींमुळे चंद्रपूर शहराच्या नोंदविण्यात येणाऱ्या तापमानात फरक पडत आहे. त्यामुळे नोंदविण्यात येणारे तापमान चुकीचे असण्याची शक्यता अधिक आहे.
नियमानुसार हवामान मापक केंद्राच्या १०० मीटर परिसरात इमारती, वस्ती नको. मात्र तुकूम येथील हे केंद्र दाट वस्तीत आहे. त्यामुळे अचुक तापमान नोंद होत नाही. दीड ते दोन डिग्रीपर्यंतचा फरक पडू शकतो. याबाबत आपण वारंवार संबंधित मंत्रालय व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. केंद्राची जागा बदलविणे आवश्यक आहे.
- प्रा. सुरेश चोपणे,
अध्यक्ष, ग्रिन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर.
चंद्रपूर सर्वाधिक उष्ण व प्रदूषित शहर आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांना तापमानाबाबत अचुक अपडेट मिळणे आवश्यक आहे. अनेक शहरात स्वयंचलित हवामान मापक केंद्र आहेत. मात्र चंद्रपुरात कर्मचारी जाऊन तापमानाची नोंद घेतो. त्यामुळे आपण येथेही स्वयंचलित हवामान मापक केंद्र उभारावे, अशी मागणी केली आहे. वारंवार पाठपुरावाही केला. मात्र अद्याप यावर कार्यवाही झालेली नाही.
-बंडू धोतरे,
मानद वन्यजीवरक्षक तथा अध्यक्ष, इको-प्रो संघटना, चंद्रपूर
१० वर्षांपासून तक्रारी
चंद्रपुरातील हवामान मापक केंद्र दाट लोकवस्तीतून हटवावे व इतरत्र स्थलांतरित करावे, अशी मागणी मागील दहा वर्षांपासून पर्यावरणप्रेमींनी केली आहे. ग्रिन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी याबाबत अनेकदा पृथ्वी मंत्रालयात व जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी केल्या आहेत. केंद्राच्या या स्थळामुळे तापमान चुकीचे मोजले जात आहे, असेही तक्रारीत त्यांनी म्हटले आहे. मात्र अद्यापही प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही.
जागा मिळते; मात्र उदासीनता नडते
तुकूम परिसरात असलेले हवामान मापक केंद्र स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी वारंवार झाल्यानंतर काही वर्षांपूर्वीच तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी याबाबत बैठक घेतली. हवामान खात्याच्या नियमानुसार कुठे जागा मिळेल, याबाबत विचार झाला. प्रारंभी जागा मिळत नव्हती. मात्र त्यानंतर बायपास मार्गावर जागा मिळाली. मात्र उदासीनतेमुळे याबाबतची कार्यवाही पुढे सरकली नाही.
केंद्राच्या १०० मीटर परिसरात इमारती नको
पृथ्वी मंत्रालयातील हवामान विभागाच्या नियमानुसार हवामान मापक केंद्र मोकळ्या जागेत असणे आवश्यक आहे. या केंद्राच्या १०० मीटर परिसरात लोकवस्ती, इमारती व इतर बांधकाम नको. याशिवाय जंगल आणि जलाशयेदेखील नसावे. असे असल्यास शहरातील तापमानाची नोंद अचुक होते. असा हवामान खात्याचा निकष आहे. मात्र चंद्रपुरात तुकूम परिसरात असलेले हवामान मापक केंद्र चुकीच्या स्थळी असल्याने तेथील नोंदी सदोष असल्याचे आता बोलले जात आहे.
स्वयंचलित हवामान मापक केंद्राची गरज
अचुक तापमानाची नोंद होण्यासाठी स्वयंचलित हवामान मापन केंद्र स्थापन करण्याची मागणी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी वारंवार केली आहे. त्यांनी २०१३ पासूनच ही मागणी रेटून धरली आहे. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी उपविभागीय अधिकाºयांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर धोतरे यांनी याबाबत पाठपुरावा केला. तरीही हा प्रश्न कायम आहे.
अनेक शहरातील केंद्र विमानतळावर
लोकवस्ती, जलाशये व जंगल नसलेल्या विमानतळावरच अनेक शहराचे हवामान मापक केंद्र आहे. त्यामुळे तेथे तापमानाची अचुक नोंद होते. चंद्रपुरात जागेचा वाद समोर येत असेल तर मोरवा विमानतळावरदेखील हवामान मापक केंद्र स्थापन केले जाऊ शकते, असेही काही पर्यावरणप्रेमींनी म्हटले आहे.