वजन काट्यांची तपासणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:56+5:302021-09-13T04:26:56+5:30
तरुणांना राजकीय प्रशिक्षण द्यावे चंद्रपूर : अनेक तरुणांमध्ये राजकारणाबाबत अनास्था आहे. त्यामुळे राजकीय पद्धतीबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी युवकांना ...
तरुणांना राजकीय प्रशिक्षण द्यावे
चंद्रपूर : अनेक तरुणांमध्ये राजकारणाबाबत अनास्था आहे. त्यामुळे राजकीय पद्धतीबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी युवकांना राजकीय प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी सामाजिक संस्थांद्वारे केली जात आहे. सर्वच क्षेत्रात युवक जात असले तरी राजकारणात युवक जाण्याचे धाडस करीत नाहीत.
बसस्थानकाचे काम त्वरित करावे
चंद्रपूर : येथील बसस्थानकाचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. परिणामी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनानंतर आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. त्यामुळे बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे बसस्थानकाचे बांधकाम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलीस भरती प्रशिक्षण राबवावे
चंद्रपूर : जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक पोलीस भरतीमध्ये सहभागी व्हावे, यासाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबविण्यात यावे, अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांकडून होत आहे. विशेषत: ग्रामीण युवक प्रशिक्षणापासून वंचित आहे. त्यातच कोरोनामुळे अनेकांमध्ये नैराश्य आले आहे.
महागाई वाढल्यामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : मागील काही महिन्यांत महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. पूर्वीच कोरोनामुळे जनसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच सततच्या दरवाढीने आर्थिक गणितच कोलमडले आहे. शासनाने महागाई कमी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
इंटरनेट सुविधा पुरवावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक तालुकास्तरावर हायस्पीड इंटरनेट सेवा नसल्याने ग्राहक हायस्पीड इंटरनेट सेवेपासून वंचित आहेत. तालुकास्तरावर हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करीत आहेत. मात्र, त्यांना नेटवर्कच मिळत नसल्याने ते अभ्यासापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्वच्छतेकडे लक्ष द्यावे
चंद्रपूर : शहरातील अनेक वॉर्डांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढली आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कार्यालयात तक्रारपेट्या लावाव्यात
चंद्रपूर : शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांबाबत अनेकांच्या तक्रारी असतात. काही जण त्या प्रत्यक्ष सांगू शकत नाहीत. यासाठी प्रत्येक कार्यालयात तक्रारपेट्या लावाव्या तसेच त्या नियमित उघडून त्यातील तक्रारींचा निपटारा करावा, अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहेत.
रस्त्यांची दुरुस्ती करावी
चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले अनेक रस्ते काही वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. रस्ते दुरुस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सोशल डिस्टन्सिंग नावापुरतेच
चंद्रपूर : मागील काही वर्षांपासून बंद असलेली दारू दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सर्वच बाजारपेठ सायंकाळी १० वाजेपर्यंत सुरू आहे. मात्र, बारमध्ये मोठी गर्दी उसळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.