दुर्गादेवीचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:38 PM2018-10-10T22:38:07+5:302018-10-10T22:38:21+5:30
गणेशोत्सवाची धामधूम नुकतीच झाली. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच भक्तीचे वातावरण होते. त्यानंतर आता नवरात्राचे पर्व सुरू होत आहे. बुधवारी घटनास्थापनेच्या शुभमुहुर्तावर दुर्गादेवीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हाभरात पाचशेहून अधिक ठिकाणी सार्वजनिक दुर्गा मंडळांनी शारदादेवी व दुर्गादेवीची स्थापना केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गणेशोत्सवाची धामधूम नुकतीच झाली. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच भक्तीचे वातावरण होते. त्यानंतर आता नवरात्राचे पर्व सुरू होत आहे. बुधवारी घटनास्थापनेच्या शुभमुहुर्तावर दुर्गादेवीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हाभरात पाचशेहून अधिक ठिकाणी सार्वजनिक दुर्गा मंडळांनी शारदादेवी व दुर्गादेवीची स्थापना केली आहे.
आषाढी पोर्णिमेनंतर सणउत्सवाचे दिवस सुरू होतात. जिल्ह्यात पोळा उत्साहात साजरा झाला. त्यानंतर गणेशोत्सवही पार पडला.
यादरम्यान ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष दहा दिवस जिल्हाभर निनादत राहिला. त्यानंतर आज बुधवारपासून जिल्ह्यात दुर्गात्सवाची धूम सुरू झाली आहे. आज दुर्गादेवीच्या स्थापनेचा दिवस असल्याने मूर्तीकारांकडे भाविकांची गर्दी उसळली होती. मूर्तीकारही अंतिम हात फिरवून मूर्ती मंडळाच्या स्वाधीन करीत होते. जिल्ह्यात सुमारे पाचशेहून अधिक सार्वजनिक दुर्गा मंडळांनी देवीची स्थापना करण्याच्या तयारी पूर्ण केली आहे. असे असले तरी केवळ ३७५ दुर्गामंडळाला सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे. काही मंडळांनी परवानगीसाठी अर्जच केलेले नाही. मागील वर्षी अश्विन नवरात्रीच्या आदल्या दिवशी ६५० मंडळाना परवानगी दिली होती. मात्र यावर्षी यात निरुत्साह दिसून येत आहे.
तरीही नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्यंत परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु असते. त्यामुळे देवीच्या स्थापनेनंतरही अनेकजण अर्ज करतात, असा अनुभव आहे. नवरात्रीचे औचित्य साधून शहरातील अनेक मंदिरामध्ये अखंड मनोकामना ज्योतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध ठिकाणी रास गरबा, दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. बंगाली कॅम्प परिसरातील मॉ काली मंदिरमध्ये घटस्थापना करण्यात आली.
डीजे, संदल नाही; मात्र उत्साह जोरात
दुर्गाउत्सव हा खऱ्या अर्थाने महिलांचा उत्सव. सार्वजनिक महिला मंडळाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शारदादेवी, दुर्गादेवीची स्थापना केली जाते. बुधवारी घटस्थापनेच्या दिवशी डिजे, संदल, बॅन्डची फारशी धामधूम दिसून आली नाही. मात्र मूर्तीकारांकडे व देवीची मूर्ती स्थापनास्थळी नेताना महिलांचा उत्साह मात्र वाखाणण्यासारखा होता.