गणरायाचे उत्साहात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:21 PM2017-08-25T23:21:09+5:302017-08-25T23:21:55+5:30
मागील अनेक दिवसांपासून आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांचा उत्साह आज चरमसीमेवर होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांचा उत्साह आज चरमसीमेवर होता. बाप्पा घरी येणार, म्हणून प्रत्येक गणेशभक्त हरकून गेला होता. या उत्साहातच शुक्रवारी गणरायाचे स्वागत करण्यात आले. छोटा बाजार, हिंदी सिटी शाळेजवळील रस्ते गणेशभक्तांनी फुलले होते. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.
दिवाळीनंतर गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव समजला होता. या उत्सवामुळे दहा दिवस शहरात, गावागावात भक्तीचे वातावरण राहते. यंदा हा उत्सव साजरा करण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून जिल्हाभरात जय्यत तयारी सुरू होती. मूर्तीकार महिनाभरापासूनच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागले होते. शुक्रवारी बाजारपेठेत गर्दी उसळण्याची शक्यता बघून अनेकांनी दोन दिवसांपासून गणेशमूर्ती विकत घेऊन ठेवल्या होत्या. त्यासाठी दोन दिवसांपूर्वीच शहरातील हिंदी सीटी शाळेजवळ आणि छोटा बाजार चौकात गणेशमूर्र्तींची दुकाने लागली आहे. हिंदी सिटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर महानगरपालिकेकडून गणेशमूर्र्तींच्या दुकानांसाठी मंडप उभारून दिले होते. शुक्रवारी सकाळपासूनच या ठिकाणी नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. हिंदी सिटी शाळेपासून जयंत टॉकीज मार्गापर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला होता.
पोलिसांची गणभक्तांना मदत
आपल्या लाडक्या गणरायाला अनेकांनी चारचाकी वाहन, आॅटोरिक्षातून घरी नेले. काहींनी दुचाकी आणल्या होत्या. दुचाकीवर मागे बसणाºयांच्या हातात मूर्ती ठेवायचे असे नियोजन होते. मात्र मूर्ती घेऊन दुचाकीवर बसताना अनेकांना अडचणीचे ठरत असल्याचे बघून पोलीस यासाठी मदतीला धावून येताना दिसले. अनेक दुचाकीस्वारांना दुचाकीवर बसल्यानंतर पोलिसांनी मूर्ती त्यांच्या हाती दिली.
पाऊस आलाच नाही
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी रात्री चंद्रपूर शहरासह काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शुक्रवारीही पाऊस पडून गणेशभक्तांची आणि मूर्तीकारांची तारांबळ उडेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळे मूर्तीकारांनी दुकानात पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच ऊन्ह निघाले. पुढे दिवसभरच असे कोरडे वातावरण राहिले.
चोख बंदोबस्त
शुक्रवारी जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडल्याची माहिती नाही. चंद्रपुरातही शांततेच गणेशोत्सवाची सुरुवात झाली. यासाठी जिल्हा पोलीस दलानेही तगाडा बंदोबस्त ठेवला होता. ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या साप्ताहिक व इतर रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. बंदोबस्तासाठी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात पाच उपविभागीय पोलस अधिकारी, २१ पोलीस निरीक्षक, ११० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ४०० पुरुष पोलीस कर्मचारी व ३११ अकरा महिला पोलिस कर्मचारी याव्यतिरीक्त ६०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड व एसआरपीएफ गोंदिया येथील एक प्लाटून बाराही दिवस या उत्सवावर नजर ठेवून असणार आहे.
डिजेमुक्त उत्सव
यंदाचा गणेशोत्सव जरा वेगळाच दिसून येणार आहे. याला कारण असे की यंदाचा हा उत्सव डिजेमुक्त असणार आहे. काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवात विशेषत: गणेश विसर्जनात बॅण्ड पथक, भजन मंडळे, ढोलकी अशी वाद्ये वाजविली जात होती. मात्र कालांतराने संदल नामक वाद्य आले आणि या वाद्याचा सर्वत्र बोलबाला झाला. त्यानंतर अलिकडच्या काळात डिजे आला आणि सर्व प्रकारची वाद्ये अडगळीत पडली. कुठलाही उत्सव असो, मिरवणूक असो, डिजे हमखास असलाच पाहिजे, अशी धारणा होती. मात्र या डिजेमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याने यंदा गणेशोत्सवातून डिजे बाद झाला आहे.