भले शाब्बास! वाघाच्या जबड्यातून मुलाने केली वडिलांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 08:09 PM2021-10-21T20:09:27+5:302021-10-21T20:20:07+5:30
Chandrapur News चिंतलधाबा बिटातील शेतशिवार नजीक पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला चढविला. मात्र बाजूलाच असलेला त्यांचा मुलगा धनराज वडिलांना वाघाच्या जबड्यातून सोडविण्यासाठी चक्क वाघाशी दोन हात करायला पुढे आला.
पी.एच. गोरंतवार
चंद्रपूर : पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या चिंतलधाबा बिटातील शेतशिवार नजीक पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला चढविला. मात्र बाजूलाच असलेला त्यांचा मुलगा धनराज वडिलांना वाघाच्या जबड्यातून सोडविण्यासाठी चक्क वाघाशी दोन हात करायला पुढे आला. कुऱ्हाड घेऊन वाघावर चालून गेला. अखेर वाघ पळून गेल्याने वडिलांची वाघाच्या तावडीतून सुटका केली. ही थरारक घटना गुरुवारी घडली.
चिंतलधाबा बिटातील कक्ष क्रमांक ९७ वनक्षेत्रातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतात बसून गजानन शिवराम मोरे (५५) रा. चिंतलधाबा हे शेतात गुरे चारत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. बाजूलाच बकऱ्या चराई करीत असलेल्या धनराजने वडिलांवर वाघाने हल्ला केल्याचे दिसले. क्षणात तो हातात कुऱ्हाड घेऊन वाघाजवळ धावत गेला. आरडाओरड करून व भीती दाखवून वाघाला पळवून लावले. मोठ्या हिमतीने मुलाने बापाला वाघाच्या जबड्यातून वाचविले.
घटनेची माहिती मिळताच गावकरी, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तत्काळ पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र गंभीर जखम असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना तत्काळ चंद्रपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, वनक्षेत्र अधिकारी आनंद कोसरे,चिंतलधाबा बिट वनरक्षक राजेंद्र मेश्राम, केमारा बिट वनरक्षक शीतल कुळमेथे, वनमजूर माणिक आत्राम, किशोर धोडरे, संजू जंबुलवार, सरपंच शुभांगी कुत्तरमारे,वन समिती अध्यक्ष देवराव भांडेकर, भुजंग पेंदोर घटनास्थळी उपस्थित होते.