विहिरी कोरड्या पडल्या, हातपंपाचे पाणी गेले खोलात
By admin | Published: May 12, 2017 02:17 AM2017-05-12T02:17:44+5:302017-05-12T02:17:44+5:30
तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे.
दररोजची कसरत: पाणी आणण्यासाठी ट्रॅक्टर, बैलबंडीचा वापर
राजेश बारसागडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे. यावर्षीसुध्दा पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने गावाच्या शेजारी शेतात असलेली बोअरवेल सावरगाववासीयांची तहान भागवित आहेत. गावातील सर्वंच विहिरी कोरड्या पडल्या असून हातपंपांचीही पातळी तळाला गेली असल्याने पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना दररोज कसरत करावी लागत आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी गावात कधीच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली नाही. मात्र अलिकडे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याकरिता कसरत करावी लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, बैलबंडी आदी वाहनाने शेतकरी स्वत:च्या शेतातील बोअरवेलवरून पाणी आणून तहान भागवित आहेत. मात्र ज्याच्याकडे कुठलेच साधन नाही, अशांपुढे मोठी जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे. शेतमालक निलकंठ पाटील बोरकर, मारोती निकुरे, राजेंद्र बरडे, अविनाश पुरी यांनी स्वत:च्या बोअरवेलचे पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
त्यामुळे तात्पुर्ती पाणी समस्या कमी झाली असली तरी कोसोदूर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोलात जाते. हे जरी खरे असले तरी सावरगावात पूर्वी पाणी टंचाई नव्हती.
मात्र गेल्या काही वर्षात बहुतांश शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात बोअरवेल बसविले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी धानपिकाची उन्हाळी लागवड केली आहे. दरम्यान, गावातील पाणी टंचाईला शेतातील बोअरवेल कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु या बाबीला कुठलाही ठोस पुरावा नाही. गावाशेजारील शेतजमीनधारक एक सामाजिक बांधिलकी म्हणून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात आहेत, ही समाधानाची बाब.
गावात पाण्याच्या दोन टाक्या आहेत. एका टाकीत नदीचे पाणी भरले जात तर दुसऱ्या टाकीत बोअरवेलवरून पाणी आणले जाते. नदीला पाणी नसल्याने एक टाकी रिकामीच राहत आहे. दुसऱ्या टाकीत बोअरवेलचे खारे पाणी असल्याने ते नागरिक पित नाहीत. त्यामुळे पाणी समस्या निर्माण होत आहे.
दरम्यान, निलकंठ पाटील बोरकर यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, माझे शेत गावाशेजारी बसथांब्यालगत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने शेतातील बोअरवेलचे पाणी महिलांना उपलब्ध करून दिले आहे. दररोज सकाळी व सायंकाळी बोअरवेलवर नागरिकांची मोठी गर्दी असते, असेही त्यांनी सांगितले.