यात्रेत गेला, नदीत उतरला, युवकाचा बुडून मृत्यू
By राजेश मडावी | Published: March 9, 2024 04:27 PM2024-03-09T16:27:08+5:302024-03-09T16:27:30+5:30
शनिवारी (दि. ९) दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली. आकाश अशोक शेडमाके (२३, रा. धानापूर) असे मृताचे नाव आहे.
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील कुलथा येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त अंधारी व वैनगंगा नद्यांचा संगमात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ९) दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली. आकाश अशोक शेडमाके (२३, रा. धानापूर) असे मृताचे नाव आहे.
कुलथा येथील हनुमान मंदिर परिसरात महाशिवरात्र व आषाढी एकादशीनिमित्त यात्रा भरते. कुलथा हे गाव गोंडपिपरी-मूल मार्गावर वढोली येथून उजवीकडे ४ कि. मी अंतरावर अंधारी व वैनगंगा नद्यांच्या मधोमध वसलेले आहे. धानापूर येथील आकाश शेडमाके हा युवक आंघाेळीसाठी नदी पात्रात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. कुलथा येथील यात्रा मंगळवार (दि. १२) पर्यंत सुरू राहणार असल्याने या घटनेनंतर पोलिसांनी नदी पात्रात चोख बंदोबस्त लावला आहे.