दारूने काय साध्य होऊ शकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:21 AM2021-05-28T04:21:55+5:302021-05-28T04:21:55+5:30
चंद्रपूर ही उद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. दारुबंदीमुळे साडेतीनशे कोटींचा महसूल बुडून जिल्ह्याच्या एकूणच विकासावर परिणाम झाल्याचा दावा सरकारने ...
चंद्रपूर ही उद्योग नगरी म्हणून ओळखली जाते. दारुबंदीमुळे साडेतीनशे कोटींचा महसूल बुडून जिल्ह्याच्या एकूणच विकासावर परिणाम झाल्याचा दावा सरकारने केला होता. दारूबंदी उठविल्याने जिल्ह्याला महसूल वाढण्याची आशा निर्माण झाली. कोट्यवधींचा महसूल विकासकामांसाठी बळ देऊ शकतो, असेही दावे केले जात आहेत.
पर्यटनाला चालना मिळेल
देशातील अनेक जिल्ह्यांना पर्यटनामधून महसूल बराच महसूल मिळतो. चंद्रपुरात जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प असल्याने जगभरातील पर्यटक येतात. जिल्ह्याचा महसूल वाढविण्यासाठी पर्यटकांच्या दृष्टीने उपयुक्त सरकार काही निर्णय घेण्याची शक्यता आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणारे पर्यटक दारुबंदीमुळे जिल्ह्याबाहेर मुक्कामी राहतात. हा प्रकार थांबू शकतो, असा दावा काही वनाधिकाऱ्यांनीही केला आहे.
तस्करीला आळा बसेल
दारुबंदी केवळ कागदावरच होती. त्यामुळे तस्करी वाढली. तस्करीमध्ये बेरोजगार युवकांचा वापर केला जात आहे. ग्रामीण व शहरी भागातही दारू तस्करीसाठी बालकांचा वापर सुरू आहे. दारुबंदी उठविल्यानंतर तस्करीला आळा बसू शकते, अशी धारणा जोपासणाऱ्या नागरिकांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
गुन्हेगारीला आळा बसेल
दारूबंदी असल्याने टोळ्यांनी चंद्रपुरात दारू पुरवठा करण्यासाठी वाॅर्ड वाटून घेतले आहेत. हाच प्रकार ग्रामीण भागातही सर्रासपणे सुरू आहे. चंद्रपूर शहरातील काही वाॅर्ड तर केवळ दारू विक्रीसाठी कुख्यात आहेत. दारू तस्करीतून गुन्हेगारी वाढली. सरकारच्या निर्णयामुळे गुन्हेगारीचा आलेख कमी होऊ शकतो.
पोलिसांना दाखवावी लागेल कर्तबगारी
दारुबंदी असूनही सर्रास दारू मिळत असल्याने पोलीस प्रशासनच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. काही दिवस कारवाया झाल्यानंतर पुन्हा दारूविक्री सुरू होते. सरकारने दारुबंदी उठविल्याने अवैध दारूविक्री रोखून पोलीस प्रशासनाला कर्तबगारी दाखवावी लागणार आहे.
दारूमुळे महिला असुरक्षित
दारूमुळे स्त्रियांवर अत्याचार होतात. जिथे दारू मिळते तिथे स्त्रिया असुरक्षित राहतात. त्यामुळे दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. दारूबंदी उठविल्याने महिलांच्या गुन्ह्यात पुन्हा वाढ होण्याचा धोका महिला व युवतींनी वर्तविला आहे.