प्रदूषणविरोधातील लढा एकाकी का?
By admin | Published: June 11, 2017 12:25 AM2017-06-11T00:25:44+5:302017-06-11T00:27:40+5:30
चंद्रपूर जिल्ह्याला सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने वेढले आहे. वायू, जल, ध्वनी प्रदूषणाने येथील नागरिक बेजार झाले आहेत.
काही सामाजिक संस्थांनी केला संघर्ष
प्रदूषण कमी झाले नाही; तरीही उद्योगबंदी उठविली
नागरिकांच्या संघर्षाला प्रशासनाची साथ नाही
रवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याला सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने वेढले आहे. वायू, जल, ध्वनी प्रदूषणाने येथील नागरिक बेजार झाले आहेत. आजच्या परिस्थितीत प्रदूषण हे जिल्ह्यातील सर्वाधिक ज्वलंत आणि गंभीर समस्या आहे. तरीही ही समस्या सोडविण्यासाठी पाहिजे तशी व्यापक लोकचळवळ निर्माण होऊ शकली नाही. जिल्ह्यातील काही सामाजिक संस्था, पर्यावरणावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांनी या विरोधात आवाज उठविला. अत्यंत ताकदीनिशी लढाही दिला. मात्र त्यांच्या लढ्याला नागरिकांची आणि प्रशासनाची साथ मिळाली नाही. समस्त जिल्हावासीयांचा हा प्रश्न असताना त्यांचा लढा एकाकी का पडला, यावर विचारमंथन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.
राज्यात कुठेही गेले आणि चंद्रपूरचे नाव घेतले की सर्वप्रथम येथील प्रदूषणच लोकांच्या डोळ्यासमोर येते. या भूमीची एवढी भिषण स्थिती उद्योगांनी करुन टाकली आहे. या उद्योगांनी स्थानिकांना काही प्रमाणात रोजगार दिला, हे मान्य आहे. मात्र त्या मोबदल्यात नागरिकांकडून काय काय हिसकावून घेतले जात आहे, हे त्यांना जडलेल्या आजारांवरून स्पष्ट होते. प्रदूषणाची हीच स्थिती कायम राहिली तर ज्या झपाट्याने येथील लोकसंख्या वाढली, त्याच झपाट्याने ती कमी होण्यास वेळ लागणार नाही.
जिल्ह्यात एकूण ७५० लहानमोठे उद्योग आहेत. यातील तब्बल सातशे उद्योग प्रदूषण ओकताहेत. १५० उद्योग तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नजरेत सर्वाधिक प्रदूषण करणारे आहेत. जिल्ह्यातील वर्धा, इरई, झरपट या नद्या वेकोलिच्या कोळसा खाणी, रासायन तयार करणारे कारखाने, पेपर मील, महाऔष्णिक वीज केंद्र व सिमेंट कंपन्यांमुळे प्रदूषित झाल्या आहेत. कारखान्यातून निघणारे रसायनयुक्त पाण्यामुळे जलस्रोत प्रदूषित होऊन जलप्रदूषणाचा धोका वाढला आहे. वाढते कारखाने, वाहनांची संख्या, डिजेचे फॅड यामुळे ध्वनी प्रदूषणही आता डोके वर काढू लागले आहे.
हे वाढते प्रदूषण थांबविण्यासाठी आजवर कुणीच काही केले नाही, असे नाही. या प्रदूषणाने अनेकांना अस्वस्थ केले आहे. ग्रिन प्लॅनेट सोसायटी, इको-प्रो, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, वृक्षाई यासारख्या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात जनआंदोलन उभे केले. प्रसंगी स्वत: पुढाकार घेत प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यायी उपाययोजना केल्या. प्रशासनाशी दोन हात करण्याचा प्रयत्नही केला. त्यांच्या प्रयत्नांना काही ठिकाणी यशही आले. मात्र प्रदूषणाची ही समस्या मुळासकट नष्ट करण्याइतपत त्यांचा हा संघर्ष नागरिक आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे व्यापक ठरू शकला नाही. त्यामुळे आजतरी हा संघर्ष व्यापक आणि अत्यंत दमदारपणे सुरू होणे गरजेचे आहे.
इको-प्रोची चळवळ
इको-प्रो संस्थेने विवीध अभियान, उपक्रम राबवून, प्रसंगी आंदोलनांचा मार्ग पत्करून शहरातील प्रदूषणाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे.चंद्रपूर रेल्वे स्थानकावरील आॅयर्न ओअर व सिमेंटचे लोंडीग-अनलोंडीगमुळे शहराच्या मध्यभागी मोठया प्रमाणात प्रदूषण होत होते. या प्रदुषण विरोधात संस्थेने विवीध आंदोलने केली. यात संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहनंतर सदर मालधक्कावरील सिंमेट व आयर्न ओअरचे लोंडीग-अनलोंडीग बंद करण्यात आले. रामाळा तलाव इकोर्नियामुक्त करण्यासाठी संघर्ष केला. रॉकेलवर चालणाऱ्या आॅटोमुळे होणारे प्रदूषण बंद करायला लावले. या संदर्भात इको-प्रोचे बंडू धोतरे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, चंद्रपूर वीज केंद्राच्या जलप्रदुषणसंदर्भात बरेचदा पाठपुरावा करूनही सुधारणा होताना दिसत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडुन केवळ बॅक गॅरंटी जप्त करणे ही एकमेव कार्यवाही केली जाते.