दारूबंदी असताना समितीची गरज काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:24 AM2017-09-07T00:24:38+5:302017-09-07T00:25:17+5:30
गावातील अवैध दारूबंदीसाठी वहाणगाव येथील नागरिकांनी अभिनव आंदोलन उभारून जिल्हा प्रशासनापुढे आव्हान उभे केले होते. २ सप्टेंबरला वहाणगाव येथील ग्रामसभेने फलक लावून दारूविक्री करण्याचा ठराव एकामताने पारीत करून संपूर्ण .....
राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : गावातील अवैध दारूबंदीसाठी वहाणगाव येथील नागरिकांनी अभिनव आंदोलन उभारून जिल्हा प्रशासनापुढे आव्हान उभे केले होते. २ सप्टेंबरला वहाणगाव येथील ग्रामसभेने फलक लावून दारूविक्री करण्याचा ठराव एकामताने पारीत करून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले. या ग्रामसभा ठरावाच्या अनुषंगाने बुधवारी सकाळी ७.३० वाजता शेगावचे ठाणेदार सुभाष बारसे यांनी दारूबंदी समितीच्या गठित करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. मात्र उपसरपंच प्रशांत कोल्हे व नागरिकांनी जिल्ह्यात दारूबंदी असताना गावात दारूबंदी समितीची गरज का? असा सवाल केल्याने ठाणेदारांना वहाणगावातून आल्यापावली परत जावे लागले.
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही वहाणगावात मुबलक प्रमाणात दारूची विक्री होते. त्यामुळे वहाणगावात परिसरातील अनेक गावातील तडीराम आपली लत भागवण्यासाठी वहाणगावचा रस्ता धरतात. या तडीरामांमुळे गावातील विद्यार्थिनी, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
या त्रासाला कंटाळून गावातील अवैध दारू हद्दपार करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले व अवैध दारूबाबत प्रशासनाच्या ठोस धोरणाचा अभावामुळे गावातील महिलांनी प्रशासनाला वटणीवर आणण्याच्या दृष्टीने अभिनव आंदोलन उभे केले. २ सप्टेंबरला ग्रामसभेत एकमताने ग्रामपंचायतीने फलक लावून दारूविक्री करण्याचा ठराव पारीत केला व दारूबंदीला चांगलीच चपराक दिली. या ग्रामसभेच्या ठरावामुळे वहाणगाव एकाच दिवशी राज्याच्या पटलावर गाजले.
मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीच्या विषयावरून वहाणगावात सुरू असलेल्या अभिनव आंदोलनामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन ढवळून निघाले आहे. त्या दृष्टीने बुधवारी सकाळी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुभाष बारसे आपल्या ताफ्यासह वहाणगावात दारूबंदी समिती गठित करण्यासाठी आले. सभेकरिता उपसरपंच प्रशांत कोल्हे, सचिन डी.पी. डाखोरे यांच्यासह ६० नागरिक उपस्थित होते.
शासनाच्या भूमिकेशिवाय गावकºयांचे सहकार्य नाही
ठाणेदार सुभाष बारसे यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ग्रामवासीयांची मदत गरजेची आहे. त्यादृष्टीने दारूबंदी समिती गठित करण्यास सुरूवात केली. मात्र उपसरपंच व गावकºयांनी जिल्ह्यात दारूबंदी असताना समितीची गरज काय? गावकºयांनी दारू सुरू करण्याबाबत ठराव घेतला असून शासन जेव्हापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार नाही, तोपर्यंत गावकरी सहकार्य करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे ठाणेदारासह पोलीस प्रशासनाला आल्यापावली वहाणगाव येथून परत जावे लागले आहे. त्यामुळे वहाणगावबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.