तणाव, भीतीतून टोकाचा विचार आल्यास काय कराल ?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 04:55 PM2024-06-27T16:55:39+5:302024-06-27T16:56:26+5:30
Chandrapur : ऐका मानसिक रोगतज्ज्ञांचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जीव नको झालाय, जीव द्यावा असे वाटणे, सतत निराश वाटणे, मनात आत्महत्येसारखे विचार येत असल्यास खचून न जाता आपल्या मनाची स्थिती आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगा, त्यावर उपाय शोधा; तरीही असा प्रकार सुरू असेल तर मानसिक रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे आवाहन मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. विवेक बांबोळे यांनी केले आहे.
अनेकदा आपल्या आयुष्यात भयंकर अनपेक्षित प्रसंग येतात. ताण वाढतो. कधी आपला अपमान होतो, कधी कुणी कमी लेखतं, कधी आर्थिक तंगी, कधी प्रेमभंग, कधी कुणी छळतं, सातत्याने प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे समोर वाटच दिसत नाही. अशावेळी निराश होणं, स्वतःवरचा ताबा सुटणं साहजिकच असतं. पण, तीच वेळ असते स्वतःला सावरून पुन्हा उभं राहण्याची. अशा वेळी आपल्या जवळच्या व्यक्तीला याबाबत माहिती देऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, सकारात्मक विचार केल्यास चांगला फायदा मिळू शकतो, असा सल्ला मानसिक रोग तज्ज्ञ बांबोळे यांनी दिला आहे.
आत्महत्येच्या घटना वाढतीवर
मागील काही महिन्यांत जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनांत वाढ झाली आहे. यामध्ये शेतकरी आत्महत्या, तरुणांच्या आत्महत्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नैराश्य आल्यास जवळच्या व्यक्तींशी संवाद साधावा.
आत्महत्येची कारणे काय?
● तणाव : विविध कारणातून वाढलेला तणाव आत्महत्येचे मोठे कारण दिसून येत आहे. मात्र, याला आत्महत्या हा पर्याय नाही. समस्या कितीही मोठी असली तरी त्यावर मार्ग निघत असतो.
● बेरोजगारी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. व्यवसायासाठी भांडवल मिळत नाही. त्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण होत असून, ते टोकाचा निर्णय घेत आहेत.
● नापिकी : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
काय करायला हवे?
● सकारात्मक विचार : आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करायला हवा. सकारात्मक विचारामुळे ऊर्जा निर्माण होते आणि मन प्रसन्न राहते.
● संवाद साधा : आत्महत्येसारखे विचार मनात येत असल्यास आपल्या जवळील व्यक्तींशी संवाद साधा, मन हलके करा.
● छंद जोपासा : आपल्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर आपल्या आवडीचे छंद जोपासावेत, चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे.
● मित्रांसोबत वेळ घालवा : मित्रांसोबत वेळ घालविल्याणे एकाकीपणा कमी होतो. त्यामुळे एकटे न राहता मित्रांसोबत वेळ घालवा.
● पौष्टिक आहार घ्या : पौष्टिक आहार घ्यावा. नियमित व्यायाम किंवा योगा केल्यास मन प्रसन्न राहते.
आपल्या मनानुसार सर्व गोष्टी घडतील असे नाही. बरेचदा तडजोड करावी लागते. परंतु, आलेली कठीण परिस्थिती ही कायमस्वरूपी नसते. ती तात्पुरती असते. नेहमी तशीच स्थिती राहील असे नाही. त्यामुळे धीर सोडू नये, संयम बाळगावा, कठीण परिस्थितीत चांगल्यात चांगलं काय करता येईल त्याच्याकडे फोकस करा. उदास, नाराज वाटत असेल तर जवळील व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोला. मानसिक रोगतज्ज्ञाचा सल्ला घ्या.
- डॉ. विवेक बांबोळे, मानसिक रोगतज्ज्ञ, चंद्रपूर