अशी दारूबंदी काय कामाची?  वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये बंदी असूनही वाहतात अवैध व बनावट दारूचे पाट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 04:55 AM2020-12-21T04:55:21+5:302020-12-21T07:00:55+5:30

Chandrapur : चंद्रपुरात अवैध दारू राजाश्रय प्राप्त झाल्याच्या आविर्भावात विकली जात आहे. दारू विक्रीचे क्षेत्रच ठरवून दिले आहे.

What is the use of such a ban? Despite the ban, illegal and counterfeit liquor is flowing in Wardha, Gadchiroli and Chandrapur | अशी दारूबंदी काय कामाची?  वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये बंदी असूनही वाहतात अवैध व बनावट दारूचे पाट

अशी दारूबंदी काय कामाची?  वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये बंदी असूनही वाहतात अवैध व बनावट दारूचे पाट

Next

-  अभिनय खोपडे/राजेश  भोजेकर/मनोज ताजने

दारूबंदी जिल्हे बंदीमुक्त करण्यासाठी ‘लिकर लॉबी’ने सुरू केलेली लॉबिंग, बंदी फसली तर ती उठवू असे शासनस्तरावर देण्यात येणारे उघड संकेत आणि जोडीला बंदी असलेल्या जिल्ह्यातच लग्नपत्रिकेसोबत दारूची बाटली भेट देणारा व्हिडीओ व्हायरल होणे या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर या दारूबंदी झोनमध्ये बंदीच्या परिणामकारकतेचा आढावा घेतला. त्याचा हा लाईव्ह रिपोर्ट...

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : भुकेलेल्यांच्या मदतीला जसे शेकडो हात धाऊन जावेत, तसे बंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये तळीरामांना दारूची कमतरता पडणार नाही, यासाठी शेकडो हात ‘तळमळ’ करीत आहेत. 
१९७४ मध्ये दारूबंदी झालेल्या वर्धा जिल्ह्यात कोटी रुपयांच्या देशी-विदेशी दारूची उलाढाल होते. नागपूर, यवतमाळ, अमरावतीसह मध्य प्रदेश येथून वर्ध्यात बनावट दारूचा पुरवठा होतो. वर्ध्यातील छोेटे-मोठे पुरवठादार ऑर्डरप्रमाणे त्या-त्या विक्रेत्याकडे माल पोचता करतात. जंगलबहुल भागात गावठी दारूच्या भट्ट्यांमधून लाखो लीटर दारू गाळली जाते. 
चंद्रपुरात अवैध दारू राजाश्रय प्राप्त झाल्याच्या आविर्भावात विकली जात आहे. दारू विक्रीचे क्षेत्रच ठरवून दिले आहे. हप्ता किती, कुठे आणि कोणत्या तारखेला पोहोचता करायचा याचेही नियोजन पोलीस यंत्रणेला हाताशी धरून झाल्याचे पोलीस सूत्रच सांगतात. बाहेरच्या व्यक्तीने दारू विकली तर लगेच धरपकड होते. मात्र, जे यंत्रणेच्या माध्यमातून दारूविक्रीत उतरले, त्यांच्यासाठी रान मोकळे आहे. अशा कडक सुरक्षेत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी सुरू आहे. 
२७ वर्षे झाली तरी गडचिरोली दारूमुक्त झाला नाही. २०० रुपयांची निप ३०० रुपयांना घ्यावी लागते, एवढाच काय तो फरक. गडचिरोलीच्या सीमेलगत तेलंगणा, छत्तीसगड ही राज्ये आहेत. सीमा ओलांडली की, परवानाप्राप्त दुकाने सहज उपलब्ध असतात. या राज्यांत दारूवर करही कमी आहे. तिकडचे दारूविक्रेते कोटा वाढवून घेतात आणि रेशनिंंगसारखी दारू इकडे उपलब्ध करून देतात.  मालवाहू वाहनांमधून आडमार्गाने रात्री दारूची आयात होते.

वर्धा सीमेवर ८० बार  
जिल्ह्याच्या सीमेवर सुमारे ८० बार आहेत. ट्रकमधील मालाच्या पेट्या शहराबाहेर एका मोकळ्या मैदानावर, निर्जनस्थळी उतरवून शहरातील इतवारा, रामनगर, नालवाडी येथील सुमारे २० ते ३० दारू पुरवठादार आपल्या खासगी वाहनाने जिल्ह्यातील इतर दारूविक्रेत्यांकडे दारूसाठा पोचता करतात. 

४ हजार रुपयांना एक पेटी 
१२०० ते १५०० रुपयांची बनावट दारूची पेटी ३ ते ४ हजार रुपयांपर्यंत विकली जाते. दिल्लीतील काही लोक हजार रुपयांच्या पेटीवर कमिशन घेऊन ट्रकमधून वर्ध्यात दारूसाठा आणतात.  हॉटेलचालक जादा दराने ही बनावट दारू ग्राहकांना विकतात. बनावट दारूतून जास्त नफा मिळतो.  २४  बाटल्यांची पेटी दारूविक्रेत्यांना ११०० ते १५०० रुपयांत मिळते. हा रिबॉटलिंगचा धंदा जोमात सुरू आहे.

अशी होते रिबॉटलिंग...
वर्ध्यात मध्य प्रदेशच्या बैतुल, शिवणी येथून कमी दराच्या दारूच्या मोठ्या बाटल्यांचा साठा येतो. या बाटलीतील दारू एका भांड्यात काढून त्यात अर्धी विदेशी आणि अर्धी देशी दारू भरून एक बनावट बाटली तयार केली जाते. त्या दारूला ‘चिपर’  म्हणतात. 

नक्षली सांभाळायचे की दारूबंदी
दारूची आयात रोखण्यासाठी किंवा दारूबंदीची प्रकरणे हाताळण्यासाठी पोलीस विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा नाही. नक्षल बंदोबस्त आणि नियमित कामे सांभाळून पोलीस दारूच्या आयातीला रोखण्याचा प्रयत्न करतात. 
गेल्या ५ वर्षांतील पोलीस कारवायांवर नजर टाकल्यास वर्षाकाठी दारूबंदीची दीड हजारांवर प्रकरणे दाखल करून २ कोटींची दारू जप्त केली जाते. पण तरीही दारूची आयात किंवा विक्री पूर्णपणे थांबू शकलेली नाही.

चंद्रपूरची दारूबंदी फसली आहे, हे दिसूनच येत आहे. दारूबंदीचे विपरीत परिणामही दिसत आहेत.  त्यामुळे दारूबंदी तत्काळ उठविली पाहिजे. तशी मागणीही मी केली आहे.
- विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर

वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हे महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेले धोरण आहे. आता याची योग्य अंमलबजावणी व्हायला पाहिजे.     - अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी, अध्यक्षा, श्रमिक एल्गार संघटना

 

Web Title: What is the use of such a ban? Despite the ban, illegal and counterfeit liquor is flowing in Wardha, Gadchiroli and Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.