ऐतिहासिक रामाळा तलावासाठी पर्यावरणमंत्री काय देणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 05:00 AM2022-02-13T05:00:00+5:302022-02-13T05:00:12+5:30
आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली. तलावामुळे भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होते. तलावावर २००८ मध्ये पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जलपर्णी काढण्यात आली. त्यासाठी तलाव कोरडा करण्यात आला; पण जलपर्णीचा प्रश्न कायम आहे. विकास आराखडा अनेक तरतुदी करण्यात आल्या. मात्र अंमलबजावणी कधी होणार हा प्रश्न आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गोंडकालीन रामाळा तलावाने शेकडो पिढ्यांची तहान भागविली. मात्र, या तलावाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाले. अतिक्रमणाचा प्रश्नही कायम आहे. मनपा व जिल्हा प्रशासनाने अनेक घोषणा केल्या. मात्र, अंमलबजावणीचा दुष्काळ असताना राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे रविवारी या तलावाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे तलावासाठी काय देणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
औद्योगिकीकरणामुळे शहराची लोकसंख्या वाढली. अनेक तलाव नागरी वस्त्यांनी गिळंकृत केले. आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली. तलावामुळे भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होते. तलावावर २००८ मध्ये पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जलपर्णी काढण्यात आली. त्यासाठी तलाव कोरडा करण्यात आला; पण जलपर्णीचा प्रश्न कायम आहे. विकास आराखडा अनेक तरतुदी करण्यात आल्या. मात्र अंमलबजावणी कधी होणार हा प्रश्न आहे.
असा आहे चंद्रपूर जिल्ह्याचा दाैरा
पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे रविवारी दुपारी सव्वातीन वाजता चंद्रपूर येथे आगमन होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता शहरातील रामाळा तलाव आणि सायंकाळी चार वाजता बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची पाहणी करतील. सायंकाळी साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे जिल्हा पर्यटनविषयक बैठक घेतील. सायंकाळी इरई नदीची पाहणी करतील. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत.
तलाव परिसरात अनेकांचे अतिक्रमण
जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचत नाही. या वनस्पतीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. सोसायटीने मत्स्यबीज टाकूनही त्याचा काही लाभ होत नाही. जलपर्णी काढण्यासाठी पाणी सोडले तर मोठे नुकसान होईल. पाणी सोडले नाही, तर तलावावर जलपर्णी पसरेल, असे दुहेरी संकट आहे.
सांडपाण्याचे केंद्र
रामाळा तलाव शहरातील सांडपाणी जमा होण्याचे केंद्र आहे. शहरातील मुख्य मच्छीनाल्याचा एक भाग झरपट नदीला मिळतो. तो सरळ तलावात येतो. त्यामुळे दूषित पाण्यावर जगणारी वनस्पती वाढते. नागरिकांना दुर्गंधी आणि विविध आजारांचा सामना करावा लागतो. मनपाने तलावात गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रतिबंध घातला होता.
विकास आराखडा कागदावरच
इको-प्रोचे बंडू धोतरे व विविध संघटनांनी रामाळा तलावाच्या विकासासाठी साखळी आंदोलन केले होते. जिल्हा प्रशासन व चंद्रपूर मनपाने संयुक्त आराखडा तयार केला. यासाठी निधी देण्याची घाेषणाही झाली. परंतु, अंमलबजावणी झाली नाही. तलावालगतच्या रेल्वे मालधक्क्यावरून रासायनिक खते चढ-उतार होते. युरिया, सल्फेटसारखी खते पावसाच्या पाण्यासोबत वाहून तलावात येतात. तलावाचा विकास केल्यास उत्तम पर्यटन केंद्र होऊ शकते