सूक्ष्म, लघु उद्योगांचे चाक मंदावले कामगारांना रोजगार मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 05:00 AM2021-05-12T05:00:00+5:302021-05-12T05:00:41+5:30
जिल्हा उद्योग केंद्राच्या अहवालानुसार, जिल्ह्यात ३ हजार २८६ सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग आहेत. कोरोनामुळे यातील सुमारे दीड हजार उद्योगांचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे. निर्बंध उठविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण केले तर नुकसानीचे भीषण चित्र पुढे येऊ शकते. मोठ्या उद्योगांनी निर्बंधाच्या काळातही उत्पादनासाठी कच्चा मालाची आयात करीत आहेत. पण, लहान उद्योगचालकांना हा खर्च परवडत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्या तरी काही अटींवर मोठे उद्योग सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र, मागील वर्षापासून सतत नुकसानीचा फटका भोगणाऱ्या ग्रामीण व तालुका स्थळावरील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांची चाके मंदावली आहेत. त्यामुळे रोजगाराविना कामगार व सुशिक्षित बेरोजगारांचे हाल होत आहेत.
जिल्हा उद्योग केंद्राच्या अहवालानुसार, जिल्ह्यात ३ हजार २८६ सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग आहेत. कोरोनामुळे यातील सुमारे दीड हजार उद्योगांचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे. निर्बंध उठविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण केले तर नुकसानीचे भीषण चित्र पुढे येऊ शकते. मोठ्या उद्योगांनी निर्बंधाच्या काळातही उत्पादनासाठी कच्चा मालाची आयात करीत आहेत. पण, लहान उद्योगचालकांना हा खर्च परवडत नाही. चंद्रपूर औद्योगिक वसाहतीमधील मोठ्या २० पैकी १६ उद्योग सुरू आहेत. कंपन्यांनीही कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या. यातील बरेच कामगार स्थायी आहेत. अनेकांना कामगार कायद्याअंतर्गत सोयीसवलती मिळतात. परंतु, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत या उद्योगांची रोजगार पुरविण्याची क्षमता कमीच आहे. सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत लादलेल्या निर्बंधांंमुळे चंद्रपूर शहर व जिल्ह्यात सुमारे पाच ते सहा कोटींच्या व्यवहाराला मोठा फटका बसल्याचा अंदाज सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारने या उद्योगांना मदत केली नाही तर मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे.
उद्योजक म्हणतात...
गेल्यावर्षीपासून जिल्ह्यातील उद्योग संकटात आहेत. उत्पादन झाले तर विक्री नाही आणि व्रिकी झाल्यास वसुली नाही, अशा दुष्टचक्रात उद्योजक सापडले आहेत. अशा परिस्थिती शासनाने पुन्हा निर्बंध सुरू झाले. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी उद्योगांचाही पाठिंबा आहे. मात्र, सरकारने आर्थिक तरतूद केली पाहिजे.
-मधुसूदन रुंग्ठा,
अध्यक्ष, एमआयडीसी, चंद्रपूर
तालुकास्थळावरील लघु उद्योगांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. खरे तर या उद्योगावर निर्भर असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. परंतु, वाहतूक, कच्चा माल, उत्पादन, विक्रीबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या. स्थिती केव्हा सुधारेल, याचीच आम्ही वाटत पाहत आहोत.
- राहुल वेगीनवार,
चंद्रपूर
मी एमआयडीसीत कंत्राटी काम करीत होतो. लॉकडाऊन लागू झाल्यापासून आठवड्यातून व पक्त तीन दिवस कामावर बोलाविल्या जात आहे. आधीच मजुरी जास्त नाही. शहरात दुसरे काम नाही. त्यामुळे सध्या ट्रालीवर फिरून शहरात फळे विकून कुटुंब चालवित आहे.
- फारूख पठाण, रहमतनगर,
चंद्रपूर
कोरोना साखळी तोडण्यासाठी जीवनाश्यक वस्तुंची दुकाने वगळता कापड व अन्य दुकाने १५ मेपर्यंत बंद आहेत. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाला. गतवर्षी झालेले नुकसान भरून निघाले नसताना पुन्हा ही आपत्ती आली आहे.
-शंकर अग्रवाल, चंद्रपूर
कच्चा माल व उत्पादन साखळी विस्कळीत
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात ५५ ते ६० हजार असंघटित कामगारांना रोजगार मिळतो. यामध्ये कृषी उत्पादनावर आधारित मूल्यवर्धन प्रक्रिया उद्योगांचाही समावेश आहे. पण, कच्चा माल व उत्पादनाची साखळी विस्कळीत झाली. त्यामुळे या उद्योगांची चाके बंद पडली. परिणामी, रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. विक्रीअभावी भाजीपाला उत्पादकांचेही अर्थकारण कोलमडले आहे.