जिल्हाधिकारी चक्क कापूस वेचतात तेव्हा.
By admin | Published: November 10, 2015 12:56 AM2015-11-10T00:56:03+5:302015-11-10T00:56:03+5:30
जिल्हाधिकारी म्हटले की वातानुकूलित कक्षात बसून प्रशासन चालविणारा अधिकारी अशीच प्रतिमा मनात उभी राहते. मात्र
चंद्रपूर : जिल्हाधिकारी म्हटले की वातानुकूलित कक्षात बसून प्रशासन चालविणारा अधिकारी अशीच प्रतिमा मनात उभी राहते. मात्र जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर हे मागील दोन दिवसांपासून विविध तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन चक्क कापूस वेचत आहेत.
सुधारित आणेवारी व सरासरी उत्पादनाची नोंद घेण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी शेताता जाऊन शेताची पाहणी करतात आणि पीक परिस्थितीचा आढावा घेतात. मागील दोन दिवसात त्यांनी कोरपना, जिवती, राजुरा, मूल व बल्लारपूर तालुक्यातील शेतांची पाहणी केली तर सोमवारी भद्रावती व वरोरा तालुक्यातील शेतांना भेटी दिल्या.
पाऊस कमी जास्त अथवा नैसर्गिक आपत्तीने झालेल्या शेतपीक नुकसान भरपाईसाठी महसूल विभागाने घोषित केलेली आणेवारी शासन विचारात घेते. पैसेवारीबाबत बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या तक्रारीसुध्दा असतात. यावर्षी अशाच तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्याची पीक पैसेवारी अचुक रहावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्वत: शेतांना े भेटी देऊन पिकांची पाहणी करण्याची मोहीम सुरू केली आहे.
सोमवारी भद्रावती व वरोरा तालुक्यातील अनेक शेतांना भेटी देऊन त्यांनी कापूस व सोयाबीन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या कापूस लागवड क्षेत्र असलेल्या शेतातील १० बाय १० चा प्लाट निवडून त्यातील कापसाची वेचणी व मोजणी जिल्हाधिकारी यांनी स्वत: शेतकरी व कर्मचाऱ्यांसोबत केली. यावरून पिकाची सरासरी उत्पादकता किती हे ठरविण्यास मदत होणार आहे.
पहिला वेचा, जमीन हलकी की भारी याचाही विचार करण्यात येणार आहे. घोडपेठ येथील शेतात जिल्हाधिकारी यांनी सोयाबीनची पाहणी केली. तर त्याच ठिकाणी कापसाची पाहणी करून वेचणी केली असता १० बाय १० च्या प्लाटमध्ये कोरडवाहू तसेच हलक्या जमिनीत सरासरी एकरी चार ते साडेचार क्विंटल कापसाचा अंदाज आला. भारी जमिनीत ९ ते १० क्विंटल सरासरी असा अंदाज आला.
दीपक म्हैसेकर यांच्यासोबत तहसीलदार सचिन कुमावत यांनी नंदोरी येथील महादेव तुकाराम तिखट यांच्या शेतात कापूस वेचून सरासरी उत्पादन नोंद केले. त्याचबरोबर चिनोरा येथील सुनील कटारिया या शेतकऱ्याच्या शेतातही अशाच प्रकारे कापसाची सरासरी उत्पादकता नोंदविण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार प्रमोद कदम होते. (शहर प्रतिनिधी)