कोरोना होऊन गेल्यानंतर इतर आजाराच्या शस्त्रक्रिया कधी करायच्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:34 AM2021-09-10T04:34:19+5:302021-09-10T04:34:19+5:30
चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहिली लाट त्यानंतर दुसरी लाट आली. आता तिसऱ्या ...
चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहिली लाट त्यानंतर दुसरी लाट आली. आता तिसऱ्या लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, कोरोना आजार होऊन गेल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांनी इतर आजाराच्या शस्त्रक्रिया कधी कराव्या, यासंदर्भात आजही रुग्णांमध्ये गैरसमज आहेत. त्यामुळे योग्य वेळी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी शस्त्रक्रिया केल्यास पुढील संकट टाळता येणे सहज शक्य आहे.
बाॅक्स
दीड महिन्याचा कालावधी आवश्यक
रुग्णांनी इतर आजाराची शस्त्रक्रिया करण्यासाठी कोरोना झाल्यानंतर दीड महिन्याचा कालावधी होऊन गेलेला असावा. मात्र, अत्यावश्यक असल्यास त्यापूर्वीसुद्धा शस्त्रक्रिया करता येते. मधुमेह, बीपी, दमा आदी असल्यास त्यांना प्रथम नाॅर्मल आणणे गरजेचे आहे. त्यानंतर ८ ते १२ आठवड्यानंतर शस्त्रक्रिया करणे शक्य आहे.
बाॅक्स
कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर फुप्फुसाचे इन्फेक्शन तसेच खोकल्याचा त्रास उद्भवल्यास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
बाॅक्स
कोरोना प्रादुर्भाव असताना अशी घ्या काळजी
कोरोना झालेल्या रुग्णांना इतर आजारासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास अत्यंत काळजी घ्यावी लागते. कोरोना रुग्णांना खोकला, सर्दी असते. अशा वेळी इतरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वसोयीयुक्त कोरोना रुग्णालय असणे आवश्यक आहे. अत्यावश्यक शस्त्रक्रिया करावी लागल्यास विशिष्ट राखीव असलेल्या रुग्णालयात भरती करणे गरजेचे आहे. अशा रुग्णालयामध्ये सर्व टीम पीपीपी किट घालून कोरोना नियमांचे पालन करून शस्त्रक्रिया करता येऊ शकते. मात्र, नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असते.
बाॅक्स
१. इमर्जन्सी शस्त्रक्रिया
या नावाप्रमाणेच अत्यंत तातडीने करावयाची शस्त्रक्रिया आहे. ती न केल्यास रुग्णांच्या जिवाला धोका होऊ शकते. यामध्ये रुग्णाला कोरोना असेल किंवा होऊन गेला असेल तरीही डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. यामध्ये हृदयरोग, मेंदू विकार, कॅन्सर, अपघात, किडनी आदी.
२. प्लान सर्जरी
या शस्त्रक्रियेमध्ये ठरवून आपल्या सोयीनुसार शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी आपली प्रकृती स्थिर झाल्यानंतर डाॅक्टर तसेच रुग्णांच्या सोयीनुसार शस्त्रक्रिया केली जाते.
बाॅक्स
ही घ्या काळजी
एखाद्या रुग्णाला कोरोना झाली नाही. असेही काही रुग्ण सध्या कोरोनामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी घाबरतात. मात्र, रुग्णांनी न घाबरता शस्त्रक्रिया करून घ्यावी. गरज असताना शस्त्रक्रिया न केल्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते.
त्यामुळे डाॅक्टरांकडून कोरोना चाचणीसोबतच छातीचा एक्स-रे, ईसीजी, तसेच फिजिशियशनचे फिटनेस प्रमाणपत्र घेऊन शस्त्रक्रिया करता येते. मात्र, रुग्णालयात गर्दी करू नये, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णास कमीत कमी लोकांनी भेटावे, जेवण, औषधी व व्यायाम, डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे, कोरोनाचा फैलाव होणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी.
कोट
कोरोना प्रादुर्भाव आता काही प्रमाणात कमी होत आहे. असे असले तरी कोरोनासोबतच आपल्याला जगावेच लागणार आहे. योग्य काळजी घेऊन
कोरोना संकटाला न घाबरता शस्त्रक्रियेमुळे बरे होणारे आजार अंगावर काढू नये. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळे आपल्याला इतर आजारांतून मुक्तता मिळेल. आजही अनेक रुग्ण कोरोना संकटामुळे शस्त्रक्रिया करण्यास घाबरतात. अशा वेळी त्यांना इतर आजारांचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-डाॅ. संजय घाटे
मूत्ररोग आणि किडनी सर्जन तथा
विदर्भ सर्जन असोसिएशन संस्थापक सचिव