बेरोजगारांच्या आशेची जेव्हा अशी होते दशा..!
By admin | Published: June 23, 2014 11:45 PM2014-06-23T23:45:39+5:302014-06-23T23:45:39+5:30
नोकरीचे स्वप्न डोळ्यात घेऊन आलेल्या बेरोजगारांनी आपल्या आशेची दशा झाल्याचा अनुभव रविवारच्या रात्री घेतला. चंद्रपुरातील बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरील उन्हाने भाजून निघालेल्या फलाटावर
गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
नोकरीचे स्वप्न डोळ्यात घेऊन आलेल्या बेरोजगारांनी आपल्या आशेची दशा झाल्याचा अनुभव रविवारच्या रात्री घेतला. चंद्रपुरातील बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरील उन्हाने भाजून निघालेल्या फलाटावर रात्री झोपून या युवकांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच लेखी परीक्षा दिली. सकाळी ना आंघोळीची व्यवस्था, ना प्रात:विधी उरकण्याची सोय ! तरीही परिस्थितीला सामोरे जात या बेरोजगारांनी नशिबाचीच परीक्षा घेतली. हे बेरोजगार होते जिल्हा पोलीस भरतीमधील पात्रतेच्या निकषाचे अडथळे पार करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले भावी पोलीस !
चंद्रपुरातील पोलीस भरतीच्या प्रक्रियेत आता लेखी परीक्षा सुरू झाली आहे. ३ हजार ८४० उमेदवार यासाठी पात्र ठरले आहेत. गेल्या आठवड्यात अनेक दिव्यातून पार पडून या कसोटीपर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांची २३ जुनला सकाळी ८ वाजता लेखी परीक्षा होणार होती. राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय आणि जनता कॉलेज हे परीक्षेचे केंद्र होते. यवतमाळ, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातून हजारो बेरोजगार आले होते. बाहेरगावाहून येणारे हे उमेदवार रात्रीच पोहचणार याची कल्पना असूनही स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र त्यांच्या व्यवस्थेची कसलीही काळजी घेतली नाही. रात्री थकूनभागून चंद्रपुरात पोहोचलेले हे बेरोजगार रात्री जागा मिळेल तिथे झोपी गेले. रेल्वेस्टेशन, चांदा फोर्ट रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर आपल्या बॅगा सांभाळत या बेरोजगारांनी अक्षरश: रात्र जागून काढली. काहींनी आळीपाळीने झोप घेत बॅगांची रखवाली केली.
नाही म्हणायला, चांदा फोर्टच्या फलाटावर विश्रांतीसाठी आलेल्या बेरोजगारांपैकी काहींची व्यवस्था महाकाली पोलीस चौकीत करण्यात आली होती. तर, रेल्वेस्थानकावरील बेरोजगरांना रेल्वे पोलिसांनी मदतीचा हात देऊन हॉलमध्ये झोपण्याची सोय करून दिली. मात्र बसस्थानकाच्या फलाटावरील बेरोजगाराचे मात्र हाल सुरू होते. दिवसभर तापलेल्या फलाटावरील गरम फरशीवर झोप तरी कशी येणार ? झोप घेण्याच्या केविलवाण्या प्रयत्नातच सकाळ उजाडली. पण ना आंघोळीची व्यवस्था; ना प्रात:विधीची सोय! अखेर जमेल तशी वेळ निभावून नेत त्यांनी परीक्षा केंद्र गाठले. सकाळी ८ ते ९.३० असा दीड तासांचा पेपर पेंगलेल्या डोळयांनी आणि आळसभरल्या शरीराने सोडवून त्यांनी आपल्याच नशिबाची परीक्षा घेतली.
उन्हातान्हात दिवसभराचा प्रवास करुन आलेल्या या बेरोजगारांनी नोकरीच्या आशेने सोसलेल्या कळा मात्र उपेक्षितच ठरल्या. ज्यांच्याजवळ पैसे होते त्यांनी सकाळी नास्ता केला; आॅटोने परीक्षा केंद्र गाठले. ज्यांच्याकडे नव्हते त्यांनी चहावर सकाळ ढकलून पायदळ वारी केली. आलेल्यांमध्ये अनेकजण गरीब घरचे होते. आपल्या व्यथा त्यांनी सांगितल्या. मात्र, नाव छापू नका अशीही आवर्जून विनंती केली. व्यवस्था नको, पण सुरक्षितता तर द्या, अशी त्यांची विनंती होती. अपरात्री आणि अपरिचित ठिकाणी आपल्या बॅगा आणि त्यातील कागदपत्रे कुणाच्या भरवश्यावर राखायची, असा त्यांचा प्रश्न होता. नांदेड जिल्ह्यातून आलेला एक जण म्हणाला, फिजिकलच्या वेळीही असेच दिवस काढले. आमच्यापैकी अनेकांच्या तब्येती चंद्रपूरच्या उन्हात बिघडल्याने काहींना भरती सोडून परत जावे लागले. यवतमाळ जिल्ह्यातील तरूण म्हणाला, फिजिकलच्या परीक्षेत आपला मित्र धावताना घसरला. मागे पडला. एक संधी मागितली. पण नकार मिळाला. बिच्चारा खुप रडला. माझ्यापेक्षाही तो गरीब होता. कुणी उंचीत मागे पडला, तर कुणी छातीत कमी. अनेकांच्या स्वप्नांचा अगदी एक-एका सेंटीमीटरने घात झाला. हे अडथळे पार करून अनेकजण लेखी परीक्षेपर्यंत पोहोचले. मात्र अडथळ्यांनी येथेही पिच्छा पुरविलाच !