आमचा लसीकरणाचा नंबर केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:26+5:302021-06-23T04:19:26+5:30
चंद्रपूर : एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी कोरोना काॅल सेंटर सुरू करून ...
चंद्रपूर : एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी कोरोना काॅल सेंटर सुरू करून याद्वारे रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांना बेड, रुग्णालयाबाबत माहिती दिली. एवढेच नाही तर कोरोना रुग्णांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली. आता रुग्णसंख्या घटली आहे. मात्र कोरोना काॅल सेंटरमध्ये अनावश्यक फोन अधिक येत असून लसीकरणाबाबत विचारणा केली जात आहे.
मागील वर्षभरात जिल्ह्यात ८४ हजार ५६७ एकूण कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील ८२ हजार ४०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १ हजार ५१८ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. सद्य:स्थितीत ६५० रुग्ण ॲक्टिव्ह असून नव्याने रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रशासनासह सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
रुग्णांना वेळीच उपचार मिळावे, त्यांना रुग्णालय, बेड आदीबाबत माहिती व्हावी तसेच कोरोना रुग्णांच्या प्रकृतीसंदर्भात विचारणा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना काॅल सेंटर उघडले आहे. या माध्यमातून नागरिकांना कोरोना संदर्भातील माहिती दिली जात होती. सध्या रुग्णसंख्या घटल्यामुळे या सेंटरवरील भार कमी झाला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षभरात या सेंटरमधून ३ लाख २९ हजार ८४६ काॅल करण्यात आले असून रुग्णांची विचारपूस करण्यात आली आहे. तर दुसऱ्या लाटेमध्ये ४ हजार ६९० नागरिकांनी कोरोना काॅल सेंटरला फोन करून रुग्णालयासंबंधी माहिती जाणून घेतली. दरम्यान, आता रुग्णसंख्या घटली. मात्र लसीकरण केव्हा होईल, सेंटर कोणते आहे, कोणती लस घेसली तर चांगले होईल, लसीकरण झाल्यानंतर ताप आल्यास काय करायचे आदी प्रश्न काेरोना काॅल सेंटरला फोन करून नागरिक विचारत आहेत. या प्रश्नांचेही जमेल तसे उत्तर देण्याचा येथील कर्मचारी प्रयत्न करीत असून नागरिकांचे समाधान केले जात आहे.
बाॅक्स
तारीख काॅल्स रुग्ण
१ मे १५७
१५ मे ७९
१ जून २५
१५ जून ०७
२० जून ०२
बाॅक्स
पहिल्या लाटेमध्ये आलेले एकूण काॅल्स-७,५४३
दुसऱ्या लाटेत आलेले काॅल्स- ४,६९०
कोरोना सेंटरमधून केलेले काॅल्स- ३,२९,८४६
बाॅक्स
कोव्हॅक्सिन घेऊ की कोविशिल्ड?
एप्रिल तसेच मे महिन्यामध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे जो तो रुग्णालय, बेड आदींबाबत प्रश्न विचारत होते. काॅल सेंटरलाही बेडसंदर्भात विचारणा केली जात होती. मात्र आता रुग्णसंख्या घटली असून स्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र अद्यापही काॅल सेंटर सुरूच आहे. मात्र या काॅल सेंटरवर आता बेड, रुग्णालयासंदर्भात काॅल येत नसून लसीकरणाबाबत बहुतांश जण काॅल करीत आहेत. विशेष म्हणजे, कोविशिल्ड घ्यायची की कोव्हॅक्सिन याबाबत तरुणाई फोन करून माहिती मिळवीत असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट
एप्रिल आणि मे महिन्यामध्ये रुग्णसंख्या वाढली होती. या महिन्यात काॅल सेंटरला मोठ्या प्रमाणात फोन येत होते. यामध्ये रुग्णालयातील बेडसंदर्भात अधिक विचारणा केली जात होती. दरम्यान, सेंटरमधून रुग्णांना दररोज फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. सध्या रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे काॅल येणे कमी झाले आहे. मात्र अन्य प्रश्नांसंदर्भात काही जण काॅल सेंटरला फोन करतात.
-डाॅ. किशोर भट्टाचार्य,
कक्षप्रमुख, कोरोना काॅल सेंटर, चंद्रपूर
बाॅक्स
लसीकरणासंदर्भात येथे करा काॅल
जिल्ह्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. ऑनलाइन नोंदणी करूनच लसीकरण होत आहे. दरम्यान काही नागरिक कोरोना काॅल सेंटरला फोन करून लसीकरणासंदर्भात माहिती विचारत आहेत. मात्र या सेंटरला लसीकरणासंदर्भात माहिती न विचारता लसीकरणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षात ०७१७२-२५४२०८ या क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.