रेतीघाटांचे लिलाव केव्हा होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:30 PM2018-12-28T22:30:35+5:302018-12-28T22:30:54+5:30
जिल्ह्यातील अनेक रेतीघाटाचा लिलाव गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रेतीचा पुरवठा सामान्य नागरिकांसह शासकीय कामाकरिता होत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे नागरपरिषद, नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांची अंदाजपत्रके सध्या धूळ खात पडलेली दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदाफाटा : जिल्ह्यातील अनेक रेतीघाटाचा लिलाव गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे रेतीचा पुरवठा सामान्य नागरिकांसह शासकीय कामाकरिता होत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यामुळे नागरपरिषद, नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीच्या अनेक विकासकामांची अंदाजपत्रके सध्या धूळ खात पडलेली दिसत आहे.
बांधकामासाठी अत्यंत आवश्यक असणारी रेती मिळत नसल्याने कामे करण्यास कंत्राटदारही पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात वैनगंगा नदीलगतच असलेल्या राजुरा, कोरपना, बल्लारशाह तालुक्यात अनेक मोठी रेतीघाटे आहेत. सदर घाटावरुन नेहमीच रेतीचा पुरवठा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होतो. यातच यावर्षी पावसाच्या पुराने सदर रेतीघाटांवर रेतीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परंतु न्यायालयीन प्रक्रियेतून रेतीघाटांचा लिलाव बंद पडला असून आज ना उद्या येईल, या प्रतीक्षेत ग्राहक दिसत आहे.
याचाच फायदा घेत आता रेती तस्करीला उधाण आले आहे. अनेक रेती तस्कर रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात करीत आहे. याबाबत अनेकदा स्थानिक तहसीलदारांकडून कारवाई झाली खरी. परंतु छुप्या मार्गाने सदर अवैध वाहतूक सुरुच आहे. अनेक ग्रामपंचायती तसेच नगर परिषदांना लाखो रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कामाचे आराखडे तयार असून प्रलंबित अंदाजपत्रकेसुद्धा प्राप्त झाली. मात्र कामाच्या तोंडावर रेतीचे ग्रहण विकास कामांना लागत असल्याची बाब आता सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व नेते कमालीचे त्रस्त आहे. रेतीघाट लिलावाची प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने विलंब लागणार आहे.
विकासकामात अडचणी
ग्रामपंचायतीमार्फत कामे करताना अनेक ग्रामपंचायती नजिकच्या रेतीघाटावरुन काळी रेती आणून कामे करीत आहे. मात्र रेतीघाटाची परवानगी नलस्याने तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत आहे. एकीकडे गावात कामे होत नसल्याची जनतेची बोंब असताना दुसरीकडे रेतीच मिळत नसल्याने कामे करायची तरी कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.