चंद्रपुरातील मार्गांवरून बस कधी धावणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 05:00 AM2021-12-31T05:00:00+5:302021-12-31T05:00:42+5:30
पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे सुमारे १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर ९५ च्या जवळपास कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. केवळ यांत्रिक विभागातील व इतर विभागातील २०० च्या जवळपास कर्मचारी कर्तव्यावर आले. परंतु, चालक-वाहक अद्यापही कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे एकही बस आगाराबाहेर निघत नाही. परिणामी प्रवाशांना अडचणींची सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यसेवेत विलीनीकरण करावे, यासाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला असूनही कर्मचारी कर्तव्यावर येण्यास तयार नाही. परिणामी प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. याऊलट काही जिल्ह्यात थोड्या प्रमाणात का होईना एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या सुरू आहे. त्यामुळे चंद्रपुरातील मार्गावरून बस कधी धावणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू केला आहे. संप मोडीत काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे सुमारे १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर ९५ च्या जवळपास कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. केवळ यांत्रिक विभागातील व इतर विभागातील २०० च्या जवळपास कर्मचारी कर्तव्यावर आले. परंतु, चालक-वाहक अद्यापही कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे एकही बस आगाराबाहेर निघत नाही. परिणामी प्रवाशांना अडचणींची सामना करावा लागत आहे.
एकही बस धावत नाही
राज्यामध्ये काही ठिकाणी महामंडळाच्या बसफेऱ्या धावत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील चारही आगारातून एकही बस धावत नसल्याचे वास्तव आहे.
एकाच दिवशी धावल्या होत्या दोन बस
मागील पंधरवाड्यापूर्वी चंद्रपूर आगारातून एक व वरोरा आगारातून एक अशा दोन बस धावल्या होत्या. मात्र चंद्रपूर आगारात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दोघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
एकही चालक वाहक कर्तव्यावर येत नसल्याने बसफेऱ्या बंद आहे. इतर विभागातील जवळपास २०० कर्मचारी कर्तव्यावर आहेत. दररोज आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना भेटून कर्तव्यावर येण्यास सांगत असते.
-स्मिता सुतावणे,
विभागीय वाहतूक नियंत्रक, चंद्रपूर
एसटीविना प्रवासाची सवय लागते की काय?
पूर्वी दररोज बसनेच प्रवास करायचो. संपापासून खासगी वाहनातून प्रवास करीत आहे. पूर्वी थोडीफार अडचण व्हायची. मात्र आता सवयच झाल्यासारखी वाटते. महामंडळाच्या संपामुळे खासगी वाहने वाढल्याने आता लवकर ट्रॅव्हल्स मिळते.
- प्रशांत खोब्रागडे, प्रवासी
एसटी महामंडळाचा संप सुरू होण्यापूर्वीपासूनच मी ट्रॅव्हल्सने प्रवास करतो. ट्रॅव्हल्समध्ये टीव्ही किंवा साऊंड बॉक्स लावून मनोरंजनात्मक प्रवास करता येत असल्याने तसेच बसपेक्षा कमी तिकीट असल्याने मला ट्रॅव्हल्सचाच प्रवास आवडतो.
- अजित गेडाम, प्रवासी