नदीपात्रातील नागरिकांचा रहिवास कधी हटणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:22 AM2019-05-05T00:22:43+5:302019-05-05T00:23:17+5:30
चंद्रपुरातील अनेक भागांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. प्रत्येकवेळी पूरबुडित क्षेत्रातील नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागते. नदीपात्रातच लोकांचा रहिवास असल्यामुळे त्यांना तिथून हटविण्यासाठी मनपाने अतिक्रमण करणाऱ्यांना काही वर्षांपूर्वी नोटीस बजावली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरातील अनेक भागांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. प्रत्येकवेळी पूरबुडित क्षेत्रातील नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागते. नदीपात्रातच लोकांचा रहिवास असल्यामुळे त्यांना तिथून हटविण्यासाठी मनपाने अतिक्रमण करणाऱ्यांना काही वर्षांपूर्वी नोटीस बजावली होती. मात्र या नोटीसला न जुमानता नदीपात्रात त्यांचा रहिवास आजही कायम आहे. झरपट नदीचे पात्र आता विस्तीर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे तेथील अतिक्रमण हटविणे क्रमप्राप्त आहे. यावर्षी चांगलाच पाऊस बरसेल, असा अंदाज आहे. असे झाले व पूरपरिस्थिती उदभवल्यास नागरिकांचे नुकसान व पुन्हा महापालिकेची धावाधाव अटळ आहे.
चंद्रपूर शहर आणि अतिक्रमण याचा अलिकडच्या काळात अतिशय घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याचे दिसून येते. या कारणामुळेच शहराचे वाटोळे होत आहे. चंद्रपूर शहरातून इरई व झरपट या दोन नद्या वाहतात. रहमतनगर, सिस्टर कॉलनी, नगिनाबाग परिसरात इरई नदीच्या पूरबुडित क्षेत्रातच नागरिकांनी घरे बांधून रहिवास सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी राहत आहेत. काहींनी तर चक्क नदीपात्रातच अतिक्रमण करून पक्की घरे बांधली आहेत. दुसरीकडे महाकाली वॉर्ड परिसरात झरपट नदीपात्रातही लोकांनी घरे बांधली आहे. या ठिकाणीदेखील त्यांचा रहिवास अनेक वर्षांपासून आहे. पावसाळ्यात नदीला पूर आला की येथील लोकांना इतरत्र स्थलांतरित करावे लागते. स्थलांतरित करूनही अनेकांचे मोठे नुकसान होते. काही वर्षांपूर्वी मनपाने झरपट व इरई नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील रहिवाशांना नोटीस बजावून ही जागा सोडण्याचे निर्देश दिले होते. येथील नागरिकांचे पुनर्वसन केल्यास ते येथून हटू शकतात. याबाबत मनपाने गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे.