कोरपना ते वणी मार्ग केव्हा होणार राष्ट्रीय महामार्ग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:32 AM2021-09-24T04:32:19+5:302021-09-24T04:32:19+5:30
कोरपना : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोरपना ते वणी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ...
कोरपना : चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोरपना ते वणी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधीनी सामूहिक प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोरपना ते वणी हा ४२ किलोमीटरचा सरळ मार्ग आहे. पूर्वी हा अखंड मार्ग वणी ते बोरी-कोरपनापर्यंत राज्य महामार्ग क्रमांक २३६ म्हणून अस्तित्वात होता. सावंगी - सानेफळ - राळेगाव - वणी - चारगाव - शिंदोला- गडचांदूर हा राज्य महामार्ग क्रमांक ३१७ अस्तित्वात आल्यानंतर वणी ते आबई फाटा रस्त्याची लांबी याला जोडण्यात आली. त्यानंतर करंजी- वणी-घुघुस प्रमुख राज्य महामार्ग क्र. ६ ची निर्मिती करून वणी ते चारगावपर्यंत चौपदरीकरण करण्यात आले. यात वणी ते चारगाव रस्त्याची लांबी जोडन्यात आली. आणि कुली (अबई फाटा) - बोरी - कोरपना असा राज्य महामार्ग क्रमांक ३७४ तयार करून नवीन नियोजनात आखणी करण्यात आली. परंतु हा रस्ता तीन राज्य महामार्गात विभागला गेल्याने त्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम योग्यरित्या होत नाही. त्यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत झालेली आहे. कोरपना-वणी हा एका रेषेतील मार्ग असल्याने, घुगुस, गडचांदूरकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी यातील मध्यंतरीची लांबी न जोडता हा एकसंघ ठेवण्यात यावा. अलीकडेच वरोरा - वणी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. यालाच कोरपनापर्यंत हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० मध्ये संलग्न करून चौपदरीकरण करण्यात यावे, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
महामार्ग झाला जीवघेणा....
सद्य:स्थितीत कोरपना ते वणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोलगट खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतूकदार व नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचा फटका परिसरातील सिमेंट, कोळसा, जिनिंग प्रेसिंग, गिट्टीखदान आदीच्या जड वाहतुकीला, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व आम नागरिकांनाही बसतो आहे. रस्त्यावरील वाढती रहदारी लक्षात घेता, चौपदरीकरण होणे वारंवार होणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेच्या दृष्टीने गरजेचे आहे.