सावलहिरा-येल्लापूर पहाडी मार्ग केव्हा होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:37 AM2021-02-27T04:37:37+5:302021-02-27T04:37:37+5:30
कोरपना : माणिकगड पहाडातील सावलहिरा ते येल्लापूर हा सहा किलोमीटरचा पहाडी मार्ग रखडलेला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे ...
कोरपना : माणिकगड पहाडातील सावलहिरा ते येल्लापूर हा सहा किलोमीटरचा पहाडी
मार्ग रखडलेला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते आहे.
कोरपना - जिवती तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील गावांना जोडणारा हा अतिशय महत्त्वपूर्ण मार्ग आहे. मात्र स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही मार्ग दगडधोंड्यांचाच आहे. परिणामी नागरिकांना यामार्गे पायदळ किंवा दुसऱ्या मार्गाने अधिकचे अंतर मोजून जावे लागते आहे. हा मार्ग पक्का नसल्याने येलापूर परिसरातील गावे आजही अविकसित असून, शिक्षण, आरोग्य सुविधेपासून वंचित आहे. हा मार्ग झाल्यास कोरपना तालुक्यातील नागरिकांना जिवतीसह तेलंगणा राज्यातील गादिगुडा, नारणूर , उटनूर , केरामेरी, असिफाबाद, आदिलाबाद, हैदराबाद शहरांना व येल्लापूर भागातील नागरिकांना कोरपना, वणी, वरोरा, मुकुटबन, नागपूर येथे
कमी अंतरात जाणे येणे सोयीचे होईल. त्यामुळे हा मार्ग प्रवासीदृष्ट्या सुखकर होणे गरजेचा आहे. या मार्गामुळे परिसरातील बाजारपेठांनाही चालना मिळेल. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
भविष्यात होऊ शकतो हा राष्ट्रीय महामार्ग...
सावलहिरा ते येल्लापूर हा मार्ग झाल्यास वरोरापासून वणी, कोरपना, येल्लपूर, तेलंगणा राज्य सीमा, गादीगुडा, आदिलाबाद हा नवा राष्ट्रीय महामार्ग तयार होऊ शकतो. ज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ वरील ताण कमी होऊन कमी अंतरात उत्तर व दक्षिणेकडील राज्यातील वाहतुकीसाठी सोपे होईल. त्यामुळे हा मार्ग होणे गरजेचा आहे.