कोरोना लसीकरण ठरविणार शाळा कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:00+5:302021-05-15T04:27:00+5:30
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा सुरू झाल्या नाहीत. या वर्षी पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले असून सर्वत्र ...
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून शाळा सुरू झाल्या नाहीत. या वर्षी पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले असून सर्वत्र दहशत पसरली आहे. दरम्यान, यावर मात करण्यासाठी लसीकरणाचा पर्याय शोधण्यात आला आहे. लसीकरण झाल्यास शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र लसीकरणाला पाहिजे तशी गती नसल्यामुळे पुढील सत्रापर्यंत सर्वांचे लसीकरण होणार की नाही? याबाबत संभ्रम आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभर प्राथमिकचे वर्गच भरले नाहीत. एवढेच नाहीतर, जिल्ह्यातील २८ हजारांवर पहिल्या वर्गातील विद्यार्थी शाळा न बघताच दुसऱ्या वर्गात गेले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बघता पुढील सत्रापासून तरी शाळा सुरू होईल, अशी पालकांची तसेच शिक्षकांची अपेक्षा आहे. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी सद्य:स्थितीत सुरू असलेले लसीकरण वेगाणे होणे गरजेचे आहे.
बाॅक्स
२८,८२४ विद्यार्थी थेट दुसरीत
मागील वर्षभरात एकही दिवस प्राथमिकचे वर्ग भरले नाहीत. त्यामुळे पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळासुद्धा बघितली नाही. मात्र ते या वर्षी थेट दुसरीत गेले आहेत.
पहिलीच्या विद्यार्थ्यांना तर ना शाळेची ओळख झाली ना शिक्षकांची. शाळेत पालकांनी दाखल केले खरे मात्र शाळाच सुरू झाली नसल्याने वर्षभर वाट बघूनसुद्धा या विद्यार्थ्यांची निराशा झाली.
पहिल्या वर्गाची पायरी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळा अनुभव असतो. नवीन शाळा, शिक्षक, नवीन वर्गमित्र जुळतात. मात्र मागील वर्षभर शाळा सुरू झाली नसल्यामुळे या सर्वांपासून हे विद्यार्थी वंचित राहिले.
बाॅक्स
ऑनलाइन आणि ऑफलाइन
कोरोना संकटामुळे मागील वर्षी प्राथमिकचे वर्गच भरले नाहीत. ८वी ते १०वीचे वर्ग दिवाळीनंतर भरले त्यानंतर २७ जानेवारीपासून ५वी ते ८वीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र काही दिवसांतच पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे तेही वर्ग बंद करण्यात आले. त्यामुळे ऑनलाइन अभ्यासक्रमावरच विद्यार्थ्यांनी वर्ष काढले.
बाॅक्स
शिक्षणाधिकारी म्हणतात,
कोरोना संकटामुळे मागील वर्षी ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर देण्यात आला. स्वाध्यायमाला तसेच शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी तज्ज्ञांद्वारे ऑनलाइन मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. दरम्यान, कोरोना संकटामुळे या वर्षी परीक्षा झाल्या नाहीत. पुढील वर्षी काय होणार, हे सध्या सांगणे कठीण असल्याचे मत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी व्यक्त केले.
कोट
विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्स्तुक
मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे शाळांना सुटीच आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसह शिक्षकही त्रासले आहेत. शासनाने लसीकरण मोहिमेला अधिक गती द्यावी, त्यामुळे किमान पुढील सत्रापासून शाळा सुरू होऊ शकेल.
- प्रकाश चुनारकर
शिक्षक, चंद्रपूर
कोट
मागील वर्षभर प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शाळेत गेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आता लसीकरण मोहीम सुरू आहे. ही मोहीम अधिक गतीने केल्यास कोरोना नियंत्रणात येऊन शाळा सुरू होण्यास मदत होईल.
- जया कृष्णा कोट्टे,
वेंडली
कोट
आता घरी राहून कंटाळा आला आहे. त्यामुळे या वर्षी तरी लवकर शाळा सुरू व्हायला पाहिजे. शाळा नाही, परीक्षा नाही फक्त सुट्याच सुट्या असल्यामुळे आता घरी राहून वैतागायला होत आहे.
- नैतिक देवाळकर
विद्यार्थी